Home ठळक बातम्या आता हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी ‘कामा’ राबवणार प्रकल्प

आता हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी ‘कामा’ राबवणार प्रकल्प

 

डोंबिवली दि.29 जून :
गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणाऱ्या डोंबिवली एमआयडीसीतील प्रदूषण कमी करण्यासाठी ‘कामा’ ने (कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन) कंबर कसली आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी बायो टेक्नॉलॉजीवर आधारित प्रकल्पानंतर आता वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठीही पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहे.

काही वर्षांपूर्वी शहराबाहेर असणाऱ्या डोंबिवली एमआयडीसी परिसरातील रासायनिक कंपनीच्या आवारात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती तयार झाली आहे. त्यामुळे साहजिकच या कालावधीत प्रदूषणाचा मुद्दाही तेवढ्याच तीव्रतेने उभा ठाकला आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती होत असताना दुसरीकडे एमआयडीसीतील कंपन्यांची प्रमूख संघटना असणाऱ्या ‘कामा’नेही प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वीच रासायनिक कंपन्यांमधील सांडपाण्यावर प्रक्रीया करून त्या पाण्याला पुनर्वापरायोग्य बनवणारा प्रकल्प सुरू झाला आहे. जैवतंत्रज्ञानावावर आधारित या पथदर्शी प्रकल्पनांतर आता ‘कामा’ने हवेतील प्रदूषण कमी करणारा प्रकल्प राबवण्याची तयार केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी दिली.

एमआयडीसीतील अनेक रासायनिक किंवा टेक्स्टाईल्स कंपन्यांमधून चिमणीच्या माध्यमातून विविध वायू हवेत सोडले जातात. गेल्या काही वर्षांत चिमणीद्वारे होणाऱ्या वायू प्रदूषणाचा मुद्दाही उग्र रूप धारण करू लागला आहे. त्यावर प्रभावीपणे उपाय योजना करण्यासाठी जैव तंत्रज्ञान प्रकल्पाची निर्मिती केलेल्या बायोनेस्ट कंपनीने एक उपकरण बनवल्याचे देवेन सोनी यांनी सांगितले. हे उपकरण संबंधित चिमणीला बसविण्यात आल्यानंतर त्यातील विषारी आणि घातक घटक हे उपकरण शोषून घेईल. ज्यामुळे वायू प्रदूषणाला मोठ्या प्रमाणात आळा बसू शकेल. येत्या आठवड्याभरात एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये हा पथदर्शी प्रकल्प सुरू केला जाणार असून त्यानंतर इतर कंपन्यांमध्येही तो राबवला जाणार असल्याचे देवेन सोनी म्हणाले.

दरम्यान एमआयडीसीतील केमिकल कंपन्यांचे प्रदूषण हा गेल्या काही वर्षांत कळीचा मुद्दा बनला असून ‘कामा’ संघटनाही आता त्यावर प्रभावीपणे उपाय योजना करताना दिसत आहे. ‘इथल्या कंपन्या टिकल्या तर रोजगार टिकतील आणि रोजगार टिकले तरच इथली अर्थव्यवस्था’ टिकेल. कोवीडच्या काळात अनेक कंपन्यांवर गंडांतर आलेले असताना या चक्राचा विचार करता शासनानेही अधिक गतिमानतेने हे चक्र टिकवण्यासाठी आवश्यक प्रयत्न आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा