Home ठळक बातम्या कल्याणच्या नविन दुर्गाडी पुलाच्या 2 लेनचे लोकार्पण; वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा

कल्याणच्या नविन दुर्गाडी पुलाच्या 2 लेनचे लोकार्पण; वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा

 

कल्याण दि. 31 मे :
पत्रीपुलाप्रमाणे बहुप्रतिक्षित असलेल्या नविन दुर्गाडी पुलाच्या 2 लेनचे आज लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रचंड प्रमाणात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑनलाईन तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फित कापून हा पूल वाहतुकीसाठी आजपासून खुला करण्यात आला. (Innaugration of 2 lanes of new Durgadi bridge of Kalyan; Relief from traffic congestion)

कल्याणहून भिवंडी, ठाणे आणि विशेषतः मुंबईला जाण्यासाठी हा पूल अत्यंत महत्वाचा समजला जातो. कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या शहरातील हजारो नागरिक याचा वापर करत असतात. मात्र अस्तित्वात असणारा पूल सध्याच्या वाहतुकीसाठी अपुरा पडू लागल्याने 6 वर्षांपूर्वी नव्या पुलाचे काम सुरू झाले होते. मात्र असंख्य अडचणींवर मात करत अखेर आज हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे दररोज सकाळी आणि संध्याकाळी कामावर जाणाऱ्या हजारो नागरिकांची आता वाहतुक कोंडीच्या विळख्यातून बऱ्याचअंशी सुटका होऊ शकेल.

गेल्या अनेक वर्षांपासून काम सुरू असणारा हा कल्याणसाठी अतिशय महत्वाचा प्रकल्प होता. जुना पूल बंद झाल्याने एकाच पुलावर वाहतूक आल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास आणि सहन करावा लागत होता. आज यापैकी नविन 2 लेनचे उद्घाटन झाले असून उरलेल्या 4 लेनचे कामही लवकरच होणार असल्याचा विश्वास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच येत्या काळात नागरिकांना 6 नविन आणि 2 जुन्या अशा 8 लेन नागरिकांना वापरायला मिळणार असल्याने मोठ्या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार असल्याचेही शिंदे म्हणाले.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता जयवंत ढाणे शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, माजी आमदार नरेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा