Home ठळक बातम्या युवा नेतृत्व’ पुरस्काराने कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा गौरव

युवा नेतृत्व’ पुरस्काराने कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा गौरव

झी मिडीयाच्या युवासन्मान २०२३ सोहळ्यात पुरस्कार प्रदान 

मुंबई दि.२५ मार्च :
डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने राज्यभरात सुरु असलेली लोकसेवेची कामे तसेच लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या विविध विकासकामांची दखल घेऊन खासदार डॉ. शिंदे यांना ‘युवानेतृत्व’  पुरस्काराने गौरविण्यात आले. इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमध्ये भारतात अग्रगण्य असलेल्या झी समूहातर्फे झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात खा.डॉ. शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्यभरामध्ये डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने लोकसेवेची कामे सुरू आहेत. तर लोकप्रतिनिधी म्हणूनही डॉ. शिंदे यांनी आपल्या मतदारसंघात अनेक अशक्य अशी विकासकामे प्रत्यक्षात उतरवली आहेत. या दोन्हींची दखल घेत झी समूहाने खासदार डॉ. शिंदे यांची युवानेतृत्व सन्मानासाठी निवड केली. झी एंटरटेमेंटचे चीफ क्लस्टर ऑफिसर (वेस्ट नॉर्थ अँड प्रीमियम) अमित शाह यांच्या हस्ते खासदार डॉ.शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण, आरोग्य, राजकीय, समाजसेवा आदी क्षेत्रांत कार्यकर्तृत्वाने आपल्या कामाची मोहोर उमटवणाऱ्या नागरिकांना ‘ झी समुहातर्फे ‘ विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते.

या पुरस्काराचे श्रेय आपल्या सर्व स्वयंसेवकांचे – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
दरम्यान पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की आपल्याला मिळालेल्या या पुरस्काराचे श्रेय डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या सर्व स्वयंसेवकांचे असून त्यांना हा पुरस्कार समर्पित करत आहोत. राज्यभरात या दोन्ही मदत कक्षांतर्फे गरजू नागरिकांची आणि रुग्णांची सेवा केली जाते. रुग्णांना योग्य पद्धतीचे उपचार मिळवून देण्यासाठी सर्व स्वयंसेवक अहोरात्र मेहनत घेत असतात. त्यामुळे या पुरस्काराचे खरे मानकरी तेच सर्वजण असल्याचे ते म्हणाले. तर विविध क्षेत्रात आपल्या कार्यातून जनसेवा तसेच राष्ट्रसेवा करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना झी समूहाने या  पुरस्काराच्या माध्यमातून एक उत्तम व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. यामुळे अनेकांना समाजासाठी उत्तम कार्य करण्याची प्रेरणा मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा