Home ठळक बातम्या कोपरचा होम प्लॅटफॉर्म येत्या 15 दिवसांत कार्यान्वित होणार – खासदार डॉ. श्रीकांत...

कोपरचा होम प्लॅटफॉर्म येत्या 15 दिवसांत कार्यान्वित होणार – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

 

कामाच्या पाहणीसाठी थेट लोकलच्या गार्डमधील डब्यातून प्रवास

डोंबिवली दि.4 सप्टेंबर :
कोपर रेल्वे स्टेशनवरील होम प्लॅटफॉर्मचे बहुतांश काम पूर्ण झाले असून येत्या 15 दिवसांत हा प्लॅटफॉर्म कार्यान्वित होणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. विशेष म्हणजे या पाहणी दौऱ्यादरम्यान खासदार डॉ. शिंदे यांनी लोकलच्या गार्डच्या डब्यातून प्रवास केल्याचे दिसून आले.
कोपर रेल्वे स्टेशनवरील होम प्लॅटफॉर्मच्या कामासह इतर महत्वाच्या कामांचीही त्यांनी आज पाहणी केली.

कोपर स्टेशनवर होम प्लॅटफॉर्म असावा अशी मागणी प्रवाशांकडून गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात केली जात होती. त्यासाठी आपण पाठपुरावा करून हे काम मंजूर करून घेतले आणि आता या होम प्लॅटफॉर्मचे काम अंतिम टप्प्यात आले असून वीज पुरवठ्यासह इतर छोटी छोटी कामे येत्या 15 दिवसात पूर्ण होतील. हा होम प्लॅटफॉर्म झाल्यावर पलीकडे राहणाऱ्या लोकांना मोठी कनेक्टिव्हिटीही निर्माण होईल आणि एफओबी चढण्याचे आणि उतरण्याचे कष्ट वाचणार असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.

त्यासोबतच कोपर स्टेशनवर ठाण्याच्या दिशेला एफओबीचे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. अप्पर कोपरचा अस्तित्वात असणारा ब्रिज अरुंद असून आतापेक्षा दुप्पट मोठ्या पुलाचे काम या कामही मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासोबतच कोपर स्टेशनबाहेरून कल्याण रिंगरोडसाठी जोडरस्त्याची मागणी करण्यात येत असून त्यादृष्टीनेही नक्कीच प्रयत्न केले जाणार असल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

महत्वाकांक्षी अशा 5 व्या आणि 6 व्या रेल्वेमार्गाचे कामही अंतिम टप्प्यात आले असून येत्या फेब्रुवारी 2022 मध्ये हे दोन्ही मार्ग सुरू होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. गेल्या कित्येक वर्षांपासून या मार्गाची चर्चा सुरू असली तरी प्रत्यक्षात या कामाची सुरुवात व्हायला 2018 साल उजाडले आहे. त्यासाठी विविध स्तरावर पाठपुरावा, मंजुऱ्या घेत रेल्वेने हे काम अंतिम टप्प्यात आणले आहे. हे दोन्ही मार्ग पूर्ण झाल्यावर लोकलच्या तब्बल 25 ते 30 गाड्या वाढतील. तसेच अप मार्गासाठी 2, डाऊन मार्गसाठी 2 आणि एक्स्प्रेससाठी 2 असे स्वतंत्र रेल्वेमार्ग उपलब्ध होणार असल्याने लोकल प्रवासाची गती वाढण्यासही मोठी मदत मिळणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

तर कल्याण यार्ड रिमॉडेलिंगमूळे लोकल वाहतूक, एक्स्प्रेस वाहतूक आणि माल वाहतुकीच्या क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. कोपरप्रमाणे दिवा स्टेशनवरही होम प्लॅटफॉर्म उभारण्याबाबत पाहणी करण्यात आली असून मतदारसंघात असणाऱ्या बहुतांश रेल्वेमार्गावरील रेल्वे क्रॉसिंग बंद करण्यात यश आले असून त्यामुळे येत्या काळात 50 च्या आसपास गाड्यांच्या फेऱ्या वाढून लोकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा