Home ठळक बातम्या कांदे-बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी मोदी पंतप्रधान झालेले नाहीत – केंद्रीय राज्यमंत्री कपिल...

कांदे-बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी मोदी पंतप्रधान झालेले नाहीत – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

 

पाकव्याप्त काश्मीर 2024 पर्यंत भारतामध्ये येण्याची अपेक्षाही व्यक्त

 

कल्याण दि.30 जानेवारी :
महागाईचे समर्थन कोणीही करू शकणार नाही. मात्र कांदे, बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले नाहीयेत असे वक्तव्य केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणात व्यक्त केले. सुभेदार वाडा कट्टा आयोजित राम कापसे स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.

एकीकडे 750 रुपये किलो दराने मटण घेतो, 500 -600 रुपयांचा पिझ्झा आपण खातो. मात्र दुसरीकडे 10 रुपयांचा कांदा, 40 रुपयांचे टोमॅटो आपल्याला महाग वाटतात. महागाईचे समर्थन कोणीही करणार नाही. मात्र कांदे, बटाटेचे भाव कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री करण्यात आलेले नसून आपण त्यामागील कारणे समजून घेतली तर त्यांना दोष देणार नसल्याचे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले. तसेच सीएए कायदा असो, 370 कलम असो की 35 ए सारखा सगळ्यात घातक कायदा असो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यामुळेच हे कायदे रद्द होऊ शकले आणि यासारखे धाडसी निर्णय घेण्यासाठी नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पाहीजे असल्याचे गौरवोद्गारही पाटील यांनी यावेळी काढले.

कदाचित 2024 पर्यंत पाकव्याप्त काश्मिर भारतात येईल…

कदाचित 2024 पर्यंत काही तरी होईल आणि पाकव्याप्त काश्मिर भारतामध्ये येईल अशी अपेक्षा करण्यास काहीही हरकत नाही. कारण या सगळ्या गोष्टी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात असे सूचक विधानही केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी केले. काश्मिरमधील 370 आणि 35 ए कलम हटवल्यानंतर विरोधकांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी. व्ही.नरसिंह राव यांनी केलेल्या कायद्याचा दाखला दिला होता अशी आठवण पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितली. नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी पार्लमेंटचे संयुक्त अधिवेशन घेत काश्मिरबाबत कायदा पारित करून घेतला. ज्यामध्ये काश्मिर ही देशाची फार मोठी समस्या आहे. पाकव्याप्त काश्मीर त्यांच्या ताब्यात असून हा भाग भारताने घेतल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही, असे पी.व्ही.नरसिंह राव यांनी नमूद केले. त्याचाच संदर्भ जोडून हे तुमचेच काम आहे, तुमच्याकडून झाले नाही म्हणून आम्ही असे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना दिल्याचेही कपिल पाटील यांनी यावेळी सांगितले.

तर आता आपण वाट बघूया कदाचित 2024 पर्यंत काही तरी होईल आणि पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये येईल अशी अपेक्षा करायला काहीही हरकत नाही. या सगळ्या गोष्टी केवळ मोदी करू शकतात. तर कांदे बटाटे, तूरडाळ, मुगडाळ यांच्या महागाईतून आपण बाहेर आले पाहिजे. देशच नसेल तर कांदे बटाटे कुठून खरेदी करणार? असा प्रश्नही केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी उपस्थित केला. (Modi has not become the Prime Minister to reduce the prices of onions and potatoes – Union Minister of State Kapil Patil

दरम्यान या महत्वाच्या विषयांसोबत त्यांनी यावेळी पंचायत राज विभागाअंतर्गत देशभरात सुरू असणाऱ्या विविध कामांचीही विस्तृतपणे माहिती दिली. तर खासदार बनणे हे आपले दिवास्वप्न होते ते पूर्ण करण्याचे काम भाजपने केल्याची प्रांजळ कबुलीही त्यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमाला माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, माजी नगरसेवक वरुण पाटील, सुभेदार वाडा कट्ट्याचे दिपक जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा