Home ठळक बातम्या कल्याणात डंपिंगच्या आगीतून पुन्हा एकदा संशयाचा धूर ; आठवड्याभरात तीन वेळा लागली...

कल्याणात डंपिंगच्या आगीतून पुन्हा एकदा संशयाचा धूर ; आठवड्याभरात तीन वेळा लागली आग

कल्याण दि. 1 मार्च :

काही वर्षांपूर्वी शांत झालेला कल्याणच्या डंपिंग ग्राऊंडवरील (kalyan dumping ground) आगीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या आठवड्याभरात डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला एक दोन नव्हे तर लागोपाठ तीन वेळा आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामूळे या आगीतून संशयाचा धूर निघत असून आग लागतेय की लावली जातेय? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Once again smoke of suspicion from the fire of dumping in Kalyan ; There were three fires in a week)

काही वर्षांपूर्वी डंपिंगच्या आगीने सर्वानाच केले हैराण…

कल्याणातील डंपिंग ग्राउंड आणि त्यावरील आगीच्या मुद्द्याने काही वर्षांपूर्वी कल्याणकरांसोबत सत्ताधाऱ्यांनाही हैराण करून सोडले होते. साधारणपणे सहा ते सात वर्षांपूर्वी डंपिंग ग्राऊंडवरील आगीच्या प्रश्नाने आक्राळ विक्राळ रूप धारण केले होते. सतत लागणाऱ्या आगीच्या घटना, त्याच्या धुरामुळे नागरिकांचा कोंडलेला श्वास आणि पालिकेतील सत्ताधाऱ्यांची कोंडी असे चित्र निर्माण झाले होते. त्यामूळे सत्ताधारी आणि प्रशासनाने याप्रश्नी गांभिर्याने दखल घेत केलेल्या कार्यवाहीत ही आग जाणीवपूर्वक लावली जात असल्याचे तत्कालीन महासभेत पुराव्यानिशी उघड केले होते. तसेच डंपिंगला पुन्हा आग लागू नये यासाठी काही उपाय योजनाही केल्या होत्या. परिणामी आगीच्या घटनांना आळा बसला होता.

या आठवड्याभरात तीन वेळा लागली आग…

तर कोवीड काळात तत्कालीन आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन घनकचरा विभागाचे उप आयुक्त रामदास कोकरे यांच्या अथक प्रयत्नांमुळे डंपिंग ग्राउंडवर कचरा टाकणे बंद झाले होते. हळूहळू कल्याणातील डंपिंगचा प्रश्न बहुतांशी सुटण्यास मदत झाली. मात्र या आठवड्यात कल्याणच्या डंपिंग ग्राऊंडवर लागोपाठ तीन वेळा आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी रात्रीच्या सुमारासच ही आग लागत असल्याने अग्निशमन दलही त्याबाबत आश्चर्य व्यक्त करत आहे.

तब्बल 9 तासांनी आग आली पूर्णपणे नियंत्रणात… 

डंपिंगवर काल रात्रीही साधारणपणे अकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली. आणि अवघ्या काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण केले. परिणामी त्यावर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला सकाळचे आठ वाजले. एक दोन नव्हे तर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या आणि अनेक कर्मचारी याकामी व्यस्त होते. लागोपाठ लागणाऱ्या आगीच्या घटनांनी काही प्रश्न निर्माण झाले आहेत.

डंपिंग ग्राऊंडवर नेमकी रात्रीच्या सुमारासच आग कशी लागते?

प्रत्येक वेळी खाडी किनाऱ्याला लागून असलेल्या कचऱ्यालाच आग कशी लागते?

डंपिंग ग्राऊंडवरील आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दल झटत असताना इतर ठिकाणी काही दुर्घटना घडल्यास त्यावेळी काय करणार?

याआधीचा अनुभव लक्षात घेऊन केडीएमसी प्रशासन य आगीची गंभीर दखल घेऊन कायदेशीर कारवाई करणार का?

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा