मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार ऑनलाइन लोकार्पण.
कल्याण दि.28 मे :
कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या शहरांना मुंबई-ठाण्याला जाण्यासाठी अत्यंत महत्वाचा असणाऱ्या नविन दुर्गाडी पुलाच्या एका मार्गिकेचे येत्या सोमवारी (31 मे 2021) लोकार्पण होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संध्याकाळी 5 वाजता या एका मार्गिकेचे ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करणार आहेत. (Relief from traffic congestion: Dedication of one lane of new Durgadi bridge on 31st May)
कल्याणसह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसरातील हजारो नागरिकांसाठी मुंबईला जाण्यासाठी हा महत्वाचा पूल आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे त्याचे काम सुरुवातीला अत्यंत रडत खडत सुरू होते. आधी कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा, त्यानंतर लागोपाठ 2 वेळा दुर्गाडी खाडी परिसरात आलेला पुर आणि हेही कमी म्हणून काय गेल्या वर्षी कोरोनामुळे आलेला लॉकडाऊन अशा असंख्य कारणांमुळेही या पुलाचे काम पूर्ण होण्यास विलंब होत होता. मात्र गेल्या वर्षभराच्या काळात एमएमआरडीए प्रशासनाने नविन कंत्राटदाराच्या माध्यमातून या पुलाच्या कामाला अधिक गतीने सुरुवात केली. आणि त्यामुळेच येत्या सोमवारी या महत्वपूर्ण पुलाची 2 पैकी एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली होणार असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली. आमदार भोईर यांनी आज या पुलाची एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता जयवंत ढाणे यांच्यासह या एका मार्गिकेची पाहणी केली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांना ही माहिती दिली.
दरम्यान ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाल्यानंतर इथल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटण्यास मदत होणार आहे. एकंदर 2021 हे वर्ष कल्याणकरांसाठी चांगलेच विशेष ठरणार असे दिसत असून सर्वाधिक चर्चिला गेलेल्या पत्रीपुलानंतर आता शहरातील वाहतूक कोंडी फुटण्याच्या दृष्टीने महत्वाचा असणारा नविन दुर्गाडी पूलही कल्याणकरांच्या सेवेत रुजू होतोय. ही नक्कीच आनंदाची बाब आहे.