Home क्राइम वॉच धक्कादायक : डोंबिवली-ठाकुर्ली दरम्यान रेल्वे रुळांवर 15 छोटे दगड रचून ठेवल्याचा प्रकार

धक्कादायक : डोंबिवली-ठाकुर्ली दरम्यान रेल्वे रुळांवर 15 छोटे दगड रचून ठेवल्याचा प्रकार

 

डोंबिवली दि.28 ऑगस्ट :
एकीकडे चालत्या लोकलवर दगडफेकीच्या घटना घडल्या असताना आता चक्क रेल्वे रुळांवर एकामागोमाग एक तब्बल 15 दगड रचून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोंबिवली ते ठाकुर्ली रेल्वे स्टेशनदरम्यान हा प्रकार समोर आला असून लोकल मोटरमनच्या प्रसंगावधनामुळे तो उघड झाला आहे. तर हा प्रकार खोडसाळपणातून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज रेल्वे पोलिसांनी वर्तवला असून याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

गुरुवारी सायंकाळच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थानकाहून 6 वाजण्याच्या सुमारास कर्जत लोकल कल्याणच्या दिशेने निघाली. डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावर लोकल पोहचली असता मोटरमनला स्लो डाऊन ट्रॅकवर दगडं ठेवण्यात आल्याचे लक्षात आले. मोटरमननेही प्रसंगावधान राखत गाडी थांबवून याबाबत रेल्वेला माहिती दिली. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत या ट्रॅकवर ठेवलेले सुमारे 15 लहान दगड बाजूला केले. याप्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करत दगड कोणी ठेवले याचा तपास पोलीस करत होते. अखेर खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून त्याने खोडसाळ वृत्तीने हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. तसेच याप्रकरणी त्याच्यासोबत आणखी कोण कोण होतं याचा शोध रेल्वे पोलीस करत आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा