Home ठळक बातम्या वाहतूकीचा चेहरामोहरा बदलणार : एमएमआर मधील सर्व शहरं – महत्त्वाचे रस्ते एकमेकांशी...

वाहतूकीचा चेहरामोहरा बदलणार : एमएमआर मधील सर्व शहरं – महत्त्वाचे रस्ते एकमेकांशी होणार कनेक्ट

एमएमआरडीए बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला यश…

मुंबई दि.24 नोव्हेंबर :
संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था एकमेकांना पूरक पद्धतीने जोडण्याची गरज व्यक्त करत यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याची संकल्पना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे (Mp Dr Shrikant shinde) यांनी गुरुवारी झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत मांडली. त्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करून त्यात सर्व महापालिकांना सामावून घेण्याची मागणी त्यांनी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडे केली. सोबतच ठाणेपल्याडच्या शहरांमध्ये असलेले सर्व प्रमुख मार्ग जोडण्यासाठी रिंग रोड तयार करत नागरिकांना अवघ्या काही मिनिटात शहराबाहेर पडण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्याची मागणीही यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. त्यावर लवकरच नामांकित सल्लागार समितीची बैठक आयोजित केली जाणार असून यामुळे ठाणेपल्याड वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार आहे. तसेच महत्वाकांक्षी मेट्रो १२ ची निविदा येत्या दोन दिवसात जाहीर केली जाणार असून त्याच्याही कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे. (The face of transport will change: All cities in MMR – important roads will be connected to each other)

सर्व शहरे आणि महत्त्वाचे रस्ते रिंगरोडने जोडण्यासाठीची संकल्पना…
कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या वाहतूक प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या मुख्यालयात आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका विशेष बैठकीचे  आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत महानगर आयुक्तांसह एमएमआरडीएचे अधिकारी, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ या पालिकांचे प्रशासकीय प्रमुख उपस्थित होते. विस्तारित ठाणे म्हणून ओळख असलेले कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर,  अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा ही शहरे विविध राज्यमार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गाने जोडलेली आहेत. मात्र या शहरांमधून बाहेर पडण्यासाठी शहरांतर्गत मोठा प्रवास करावा लागतो. हा प्रवास टाळून अवघ्या काही मिनिटात वाहन चालकाला महामार्गाला पोहचता यावे, यासाठी ही सर्व शहरे आणि महत्त्वाचे रस्ते रिंगरोडने जोडण्यासाठीची संकल्पना आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी  बैठकीत मांडली. त्यावर एमएमआरडीए प्रशासनानेही सकारात्मक भूमिका घेतली असून लवकरच या नव्या मार्गाच्या आखणीसाठी नामांकित सल्लागारांची बैठक आयोजित केली जाणार असल्याचे सांगितले. सध्या शहरातून महामार्गांवर पोहोचण्यासाठी वाहन चालकाला मोठा वेळ खर्ची घालवा लागतो. या सर्व शहरांमधून जाणारे मार्ग एकमेकांना जोडले गेल्यास वाहने अवघ्या काही मिनिटांत शहराबाहेर पडू शकतील.

महामार्ग संलग्नतेबाबत सर्व महापालिकांची बैठक घ्या…
सोबतच मुंबई महानगर प्रदेशात गेल्या काही वर्षात नवनवीन राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग उभारणी सुरू आहे. या सर्व मार्गांसाठी संलग्नता करणे आवश्यक आहे. ही संलग्नता करण्यासाठी संपूर्ण महानगर प्रदेशाचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याची गरज आहे, असे सांगत यासाठी एमएमआरडीएने पुढाकार घ्यावा. तसेच या कामी सर्व महापालिका प्रमुखांना बोलावून त्यासंदर्भात बैठक घेण्याचे आवाहनही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बैठकीत केले. त्यावरही एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी लवकरच ही बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. या संकल्पनेची अंमलबजावणी झाल्यास मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार आहे.

मेट्रो १२ ची निविदा येत्या दोन दिवसात…

कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण या भागांना थेट नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईशी जोडणाऱ्या मेट्रो १२ च्या कामालाही लवकर सुरुवात होणार असून त्याची निविदा येत्या दोन दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. मेट्रो १२ चे काम जलद गतीने सुरू असून या निविदे नंतर मेट्रोच्या उभारणीतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे.

 

महामार्ग जोडले गेल्यास वाहतुकीचे नवे जाळे निर्माण होणार – डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा

शहरांच्या वेशीवरून किंवा शहरातून जाणारे राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग एकमेकांना जोडल्यास वाहतुकीचे नवे जाळे निर्माण होईल. सध्या वाहन चालकाला शहराबाहेर पडण्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ वाचेल. शहरांतर्गत वाहतुकीचा भारही कमी होणार आहे. त्यामुळे ठाणे पल्याडच्या शहरांमध्ये ही संकल्पना राबवण्याची मागणी केली आहे. मुंबई महानगर क्षेत्राच्या वाहतूक संलग्नतेसाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याची मागणी केली असून त्यावर एमएमआरडीए प्रशासन सकारात्मक आहे. तर मेट्रो १२ ची निविदाही येत्या दोन दिवसात जाहीर होणार आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा