Home ठळक बातम्या हा लढा केवळ शिवसेनेसाठी नाही तर देशाच्या लोकशाहीसाठी – उद्धव ठाकरे

हा लढा केवळ शिवसेनेसाठी नाही तर देशाच्या लोकशाहीसाठी – उद्धव ठाकरे

कल्याण लोकसभेत दौरा करत फुंकले निवडणुकीचे रणशिंग

कल्याण डोंबिवली दि.14 जानेवारी :
आमदार अपात्रतेबाबत ज्या पद्धतीने निकाल दिला गेला. हिंमत असेल तर लोकांमध्ये जाऊन विचारा शिवसेना कोणाची असे सांगत आपला हा लढा केवळ शिवसेनेसाठी नाहीये तर देशाची लोकशाही वाचवण्यासाठी हे युद्ध सुरू झाल्याचा एल्गार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला आहे. (This fight is not only for Shiv Sena but for the country’s democracy – Uddhav Thackeray)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कल्याण लोकसभा मतदारसंघात दौरा करत शक्ती प्रदर्शन केले. कल्याण लोकसभेतील अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, दिवा, कळवा मुंब्रा येथील आपल्या पक्षाच्या शाखांना भेट दिली.

अंबरनाथ शिव मंदिरासमोर घेणार विजयाची सभा…
आपण केवळ शाखा भेटीचा कार्यक्रम जाहीर केला तर जणू आपण लोकसभा जिंकल्यासारखे वातावरण तयार केले आहे. आज आपण रस्त्यावर आल्यामुळे त्यांचे दिल्लीचे रस्ते बंद झाले असून कल्याण लोकसभा मतदारसंघात आपला विजय नक्की आहे. आपल्या या विजयाची सभा अंबरनाथ शिव मंदिरासमोर घेणार असल्याचे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्वेतील शाखेला भेट दिल्यानंतरत्यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

चित्र कसं आणि कधी काढायचं आपल्याला माहिती आहे…

आज आपण मुद्दामूहून आलो आहोत. कारण आपलीही खूप इच्छा होती आणि अनेक जण सांगत होते की तुमची ठाणे कल्याणात वाट बघत आहेत. मातोश्रीवर मोजके पदाधिकारी येऊन भेटतात. म्हणून आज मी तुमच्या शाखेमध्ये तुम्हाला भेटायला आल्याचे ते म्हणाले. तर मी एका व्यंगचित्रकाराचा मुलगा आहे. चित्र कधी आणि कसं काढायचं हे मला चांगले ठाऊक असल्याचे प्रत्युत्तर त्यांनी विरोधकांना दिले.

तुमच्या मनातील संताप मतपेटीमध्ये व्यक्त करा…

आपण मोठ्या मनाचे आहोत याचा अर्थ गद्दारांना आपण संधी देऊ असा मुळीच अर्थ काढू नका. तुमच्या मनातील जो संताप आहे, तो येत्या निवडणुकीत मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त करा. गद्दारांची घराणेशाही आम्ही या निवडणुकीत गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दांत उध्दव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.

या दौऱ्यावेळी उध्दव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत, राजन विचारे, विजय साळवी, सचिन बासरे, सदानंद थरवळ, हर्षवर्धन पालांडे, वरुण सरदेसाई यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा