Home ठळक बातम्या समाजसेवेच्या वेडात कल्याणातील 17 सायकलपटुंची तब्बल 1200 किमीची वारी

समाजसेवेच्या वेडात कल्याणातील 17 सायकलपटुंची तब्बल 1200 किमीची वारी

आरोग्याच्या संदेशासोबत जपत आहे सामाजिक बांधिलकीही

कल्याण दि.9 डिसेंबर :
समाजाप्रती असणारी आपली सहवेदना व्यक्त करण्यासाठी कल्याणातील 17 सायकलपटू यावर्षीही तब्बल 1 हजार 200 किलोमीटरच्या सायकलवारीसाठी आज पहाटे रवाना झाले. कल्याणच्या दुर्गाडी चौकापासून कर्नाटकामधील कूर्ग येथे निघालेल्या या सायकलपटुंना केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी झेंडा दाखवत रवाना केले. या सायकलवारीच्या माध्यमातून जमा झालेला निधी पैशांअभावी उपचार रखडलेल्या, वैद्यकीय सेवा मिळू न शकलेल्या गरजू कुटुंबीयांना दिला जाणार आहे.

कल्याणातील बाईकपोर्ट संस्थेचे ताहीर शेख यांच्या पुढाकाराने कल्याणातील एक एक सायकलपटू एकत्र येत गेले. आणि मग त्यातूनच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या सायकलवारीला प्रारंभ झाला. गेली चार वर्षे हे सर्व सायकलपटू सामाजिक भान ठेवत देशाच्या विविध राज्यातील भागात सायकल रॅली काढत असल्याची माहिती सहभागी सायकल पटू डॉ. रेहनूमा यांनी दिली. विशेष म्हणजे या सायकल रॅलीमध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर, व्यावसायिक, पोलीस आदी विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती सहभागी झाल्या आहेत.

या सर्व 17 सायकल पटुंसमोर पुढील 7 दिवसांत कल्याण ते कूर्ग हे तब्बल 1 हजार 200 किलोमीटर अंतर कापण्याचे आव्हान असणार आहे. त्यामुळे दररोज साधारणपणे पावणे दोनशे किलोमीटरचे अंतर गाठण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही या सायकल पटुंतर्फे सांगण्यात आले. सायकलपटुंचा उत्साह वाढवण्यासाठी कल्याण डोंबिवली महपालिकेचे अधिकारी संजय जाधव यांच्यासह विविध सामाजिक संस्था आणि त्यांचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदाच्या सायकलवारीचे हे पाचवे वर्ष असून याआधीही सामाजिक बांधिलकी जपत ही सायकलवारी संपन्न झाली आहे.

दरम्यान या सायकलवीरांकडून आरोग्याच्या संदेशासोबतच सामाजिक जाणिवेतून केल्या जाणाऱ्या उपक्रमाचे केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी यावेळी कौतुक केले. तसेच केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व आणि डोंबिवलीतील 90 फुटी रस्त्यांवर माय सिटी फिट सिटीची संकल्पना आपण राबवत असल्याचेही भागवत यांनी सांगितले. तसेच आरोग्यप्रेमी नागरिकांनी या संकल्पनेला अधिकाधिक संख्येने प्रतिसाद देण्याचे आवाहनही यावेळी केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा