Home ठळक बातम्या कल्याण परिमंडळात 42 हजार थकाबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित – महावितरणची माहिती

कल्याण परिमंडळात 42 हजार थकाबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित – महावितरणची माहिती

 

कल्याण दि. 23 सप्टेंबर :
कल्याण परिमंडळात गेल्या 3 आठवड्यात सुमारे 42 हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून वीजबिल भरून आर्थिक परिस्थितीत असलेल्या महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले आहे.

गेल्या 3 आठवड्यात कल्याण मंडल 1 (कल्याण- डोंबिवली) अंतर्गत 5 हजार 465, कल्याण मंडल दोनअंतर्गत (उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग) अंतर्गत 7 हजार 972, वसई मंडल (वसई व विरार) अंतर्गत 13 हजार 214 आणि पालघर मंडल (वसई व विरार वगळून उर्वरित पालघर जिल्हा) अंतर्गत 15 हजार 250 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. तसेच 25 पाणीपुरवठा योजना आणि 149 पथदिवे जोडण्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. यापैकी 20 हजार 211 ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकी आणि पुर्नजोडणी शुल्काचा भरणा करून वीजपुरवठा सुरळीत करून घेतला आहे. तर सप्टेंबर महिन्यापूर्वी 1 लाख 65 हजार थकाबाकीदारांचा शिवाय 311 पाणीपुरवठा योजना, 786 पथदिवे जोडण्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

कल्याण परिमंडलात 6 लाख 72 हजार ग्राहकांकडे 669 कोटी रुपयांचे वीजबिल थकीत

कल्याण परिमंडलात सर्व वर्गवारीतील 6 लाख 72 हजार ग्राहकांकडे 669 कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. या थकबाकीदार ग्राहकांनी तातडीने वीजबिल भरून महावितरणला संकटाच्या काळात सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता औंढेकर यांनी केले आहे.

वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांवर विशेष लक्ष

वीजपुरवठा खंडित केल्यानंतर चालू वीजबिल, थकबाकी तसेच पुर्नजोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार नाही. थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. या ग्राहकांनी शेजारून अथवा परस्पर जोडणी किंवा अन्य माध्यमातून विजेचा अनधिकृत वापर केल्याचे आढळल्यास थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगत वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा