Home ठळक बातम्या 2024 नंतर दिल्लीतूनही फंड आणू शकाल – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे सूचक...

2024 नंतर दिल्लीतूनही फंड आणू शकाल – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे सूचक विधान

कल्याण डोंबिवलीत विविध कामांचे लोकार्पण आणि भूमीपूजन

डोंबिवली दि.17 फेब्रुवारी :
सध्याच्या महाविकास आघाडीच्या काळात एमएमआर रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतोय. 2024 नंतर तसा दिल्लीतूनही आपण फंड आणू शकाल असे सूचक विधान करत राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या भविष्यातील वाटचालीची दिशा स्पष्ट केली. डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील टप्पा क्रमांक 1 आणि 2 मधील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे भूमीपूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याने डोंबिवली एमआयडीसी विभागातील रस्त्यांसाठी राज्य शासनाकडून मंजूर निधीतून हे रस्ते केले जाणार आहेत.

मुंबई ही आपली माय आहे तर कल्याण डोंबिवली मावशी…
महाराष्ट्रात 51 टक्के शहरीकरण झाले असून लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेषतः एमएमआर रिजनसाठी फंड किती उपलब्ध होतोय हा एक प्रश्न असायचा. पण आता जसा आपण इकडे फंड आणतोय तसा यापूर्वी कधीही आणू शकलो नाही अशी आठवण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवली.
तर निधी येत असल्याने सध्या शुभेच्छा तर येतच आहेत, फंडही येतोय. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कल्याण डोंबिवलीकडे बारीक लक्ष आहे, कारण घरी आईकडूनही सतत सांगितले जाते की कल्याण डोंबिवलीला फंड द्या. त्यामुळे आपण हक्काने सांगू शकतो की जशी मुंबई माझी आई आहे तशीच कल्याण डोंबिवली आपली मावशी आहे असे प्रांजळ मतही आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.

इथल्या कामाचा धडाका तुफान आहे…
इकडे जसा निधी येतोय त्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तेवढीच मेहनत घेतली आहे. ते अविश्रांत अशी मेहनत घेत असल्याने इकडे जो कामाचा धडाका लागला आहे तो तुफान आहे असे गौरवोद्गारही आदित्य ठाकरे यांनी यावेळी काढले.

2024 नंतर दिल्लीतूनही फंड आणू शकाल…
दिल्लीतूनही फंड आला पाहीजे. 2-3 दिवसांपूर्वी आपण गोव्यामध्ये प्रचार करत होतो. आणि इतर राज्यांमध्ये पण आपण निवडणूक लढवणार आहोत. जसा निधी आपण सध्या महाराष्ट्र सरकारमधून आणतोय 2024 नंतर दिल्लीतूनही तसाच निधी आणू शकाल असे सूचक विधानही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना उद्देशून केले. तसेच आदित्य ठाकरे यांनी यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून सुरू असणाऱ्या विविध विकासकामांचा उल्लेख करत त्यांच्या कामाचेही कौतूक केले.

भाजप आणि काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश…

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे,यांच्या उपस्थितीत भाजपच्या रणजित जोशी, वृषाली रणजित जोशी, नितीन पाटील, रंजना नितीन पाटील यांच्यासह काँग्रेसचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी या कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश केलेला पाहायला मिळाला.

तर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याणच्या खाडीकिनारी होणाऱ्या नौदल संग्रहालय आणि नदीकिनारा सुशोभीकरण कामाचेही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्याचबरोबर नविन दुर्गाडी पुलाच्या उर्वरित मार्गिकांचे, केडीएमसी मुख्यालयात नूतनीकरण करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर सभागृहाचे उद्घाटन आणि कल्याण पूर्वेतील केडीएमसीच्या सुसज्ज डायलिसीस सेंटरचे लोकार्पणही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार विश्वनाथ भोईर, गणपत गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शहर अभियंता सपना कोळी – देवनपल्ली आदी मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा