Home ठळक बातम्या डोंबिवलीत जमणार 1 हजार मराठी उद्योजकांची मांदियाळी ; सॅटर्डे क्लब – एमआयडीसीचा...

डोंबिवलीत जमणार 1 हजार मराठी उद्योजकांची मांदियाळी ; सॅटर्डे क्लब – एमआयडीसीचा पुढाकार

 

डोंबिवली दि.11 सप्टेंबर :
सांस्कृतिक उप राजधानी अशी ख्याती असणाऱ्या डोंबिवली नगरीत येत्या बुधवारी राज्यभरातील तब्बल १ हजार उद्योजक जमणार आहेत. गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून मराठी उद्योजकांना सर्वार्थाने घडवणाऱ्या आणि त्यांची एकत्रित मोट बांधणाऱ्या सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून आणि एमआयडीसीच्या सहकार्याने हे सर्व उद्योजक एकत्र येणार आहेत. निमित्त आहे ‘इंजिनिअर्स डे’ च्या पूर्वसंध्येला डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित राज्यस्तरीय उद्योजकता परिषदेचे.

‘प्रत्येक उद्योजक हा आपापल्या व्यवसायाचा अभियंता असतो आणि त्यामुळेच प्रत्येक अभियंत्याने व्यावसायिक बनले पाहिजे या संकल्पनेवर आधारित ही राज्यस्तरीय उद्योजकता परिषद होणार असल्याची माहिती काल पत्रकार परिषदेत देण्यात आली. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे या परिषदेचे उद्घाटक असणार असून त्यांच्यासोबत बीव्हीजी ग्रुपचे सुप्रसिद्ध मराठी उद्योजक हणमंतराव गायकवाड, एमआयडीसीचे सीईओ डॉ. पी. अनबलगन, केंद्र सरकारच्या एमएसएमई विभागाचे महाराष्ट्राचे संचालक पार्लेवार, महाराष्ट्र राज्य इनोव्हेटिव्ह सोसायटीचे सीईओ डॉ. नामदेवराव भोसले आदी दिग्गज मंडळी उद्योजकाना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती ठाणे ईस्टर्न रिजन हेड राजेश चौधरी यांनी दिली.

तसेच या परिषदेत केवळ कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या भागातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात असणाऱ्या विविध संघटनांमधील १ हजार मराठी उद्योजक सहभागी होणार असल्याची माहिती सॅटर्डे क्लबचे ठाणे रिजन हेड नितीन बोरसे यांनी दिली.

तर या परिषदेतून राज्यभरातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या शासनापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करण्यासह उद्योजक वाढीसाठी आवश्यक असणारे उद्योजकांचे नेटवर्किंग करण्याचा उद्देश असल्याचे सॅटर्डे क्लब पीआर विभगाच्या संतोष पाटील यांनी दिली.

तसेच सध्आजमितीस जगभरातील १० देशांमध्ये असणारे मराठी उद्योजक सॅटर्डे क्लबचे सदस्य असून आता आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या मराठी उद्योजकांची मोट बांधण्यासाठी काम करत असल्याची माहिती सॅटर्डे क्लबचे सेक्रेटरी जनरल विनीत बनसोडे यांनी दिली. त्यासोबतच मराठी महिला उद्योजकांनाही प्रोत्साहन आणि आवश्यक ती मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा