भिवंडी दि .30 एप्रिल :
भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे यावेळी निलेश सांबरे यांनी अपक्ष उमेदवारासह काँग्रेसच्या नावाचाही अर्ज भरल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. यावेळी सांबरे यांना समर्थन देण्यासाठी जिजाऊ संघटनेचे असंख्य कार्यकर्ते, पाठींबा दिलेल्या पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (2 applications filed by Nilesh Sambare for Bhiwandi Lok Sabha Constituency; A big show of strength from the supporters)
भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक कोंबडपाडा येथून प्रांत कार्यालयापर्यंत निलेश सांबरे यांच्या समर्थनार्थ एक रॅली काढण्यात आली. ज्यामध्ये युवा वर्गासह वृद्ध महिला – पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये जमलेल्या समर्थकांकडून “चला शेतकऱ्याच्या मुलाला संसदेत पाठवण्यासाठी सज्ज होऊया; परिवर्तनाचा आरंभ करूया!” , “माझं मत विकासाला, जिजाऊच्या निलेश सांबरेंना!” , परिवर्तनाचे खरे दावेदार; निलेश सांबरेच आमचे भावी खासदार!” अशा प्रकारची घोषणाबाजी यावेळी पाहायला मिळाली.
तर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना निलेश सांबरे म्हणाले की, बदलापूर, वाडा, शहापूर येथील रुग्णालयांची दुरावस्था आहे. येथे एज्युकेशन हब नाही. लोकसभा क्षेत्रात मेडिकल कॉलेज नाही, आयटी पार्क नाही. वस्त्रोद्योग व्यवसायाबाबत कोणताही सकारात्मक निर्णय होत नाही. सुरतला जसा टेक्स्टाईल पार्क आहे तसा भिवंडीतही झाला पाहिजे. येथेही माणसे राहतात मात्र त्याकडे कोणताही नेता-लोकप्रतिनिधी गांभीर्याने बघत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी मी अपक्ष, तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून फॉर्म भरला असल्याचे त्यांनी सांगितले .
यावेळी निलेश सांबरे यांना पाठिंबा देण्यासाठी कुणबी सेना ठाणे जिल्हाध्यक्ष शरद पाटील, उपजिल्हा प्रमुख शाम दुपारे, तालुकाप्रमुख भगवान सांबरे, गुरुनाथ शेलार उपजिल्हाप्रमुख ठाणे कुणबी सेना, केशव पाटील जिल्हा संघटक ठाणे कुणबी सेना, पराग पष्टे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष किसान काँग्रेस, सुहास बोंडे अध्यक्ष खानदेश सेना , वंचित बहुजन आघाडीचे प्रभारी मिलिंद कांबळे , वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हा अध्यक्षा माया कांबळे, मौलाना आजाद विचार मंचाचे ठाणे जिल्हा व भिवंडी शहर अध्यक्ष जव्वाद चिखलेकर, शाहझहान अन्सारी (महिला भिवंडी शहर जिल्हाप्रमुख ) यांसह लाखो कार्यकर्ते सांबरे समर्थक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.