Home कोरोना कोवीडचे 5 किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण सापडणाऱ्या इमारती सील करण्यास केडीएमसीकडून सुरुवात

कोवीडचे 5 किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण सापडणाऱ्या इमारती सील करण्यास केडीएमसीकडून सुरुवात

 

कल्याण / डोंबिवली दि. 25 फेब्रुवारी :
कल्याण डोंबिवलीमध्ये दिवसागणिक कोवीड रुग्णांची संख्या वाढत असून केडीएमसी आरोग्य विभागही आणखीन सतर्क झाला आहे. परिणामी ज्याठिकाणी कोवीडचे 5 किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत अशा इमारती सील करण्यास सुरुवात केल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीत सध्या वाढत चाललेल्या रुग्णांमध्ये 70 टक्के रुग्ण इमारतीतील असल्याची माहितीही समोर आली आहे.
गेल्या आठवड्याभरापासून कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे 100 हून अधिक रुग्ण आढळू लागले आहेत. विशेष म्हणजे सध्या आढळणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे इमारत -सोसायटी परिसरातील आहेत. तसेच यातील बहुतांश व्यक्ती या मुंबईला ये-जा करणाऱ्या असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय-आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी एलएनएनशी बोलताना दिली. त्यामूळे महापालिकेचा आरोग्य विभागही सतर्क झाला असून पुन्हा एकदा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ज्या इमारतीमध्ये किंवा सोसायटीमध्ये 5 किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत अशा इमारती सील करण्यास सुरुवात केल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

तर कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेले कोवीड सेंटरही पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात येत आहेत. कल्याण पश्चिमेच्या लालचौकी येथील आर्ट गॅलरीत 109 आयसीयू आणि 207 ऑक्सिजन बेडची सुविधा आहे. त्यापैकी सध्या 20 आयसीयू आणि 30 ऑक्सिजन असे 50 बेड सुरू करण्यात आले आहेत. तर कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन उर्वरित बेडही कार्यान्वित केले जातील अशी माहिती साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी एलएनएनला दिली. तर डोंबिवलीमध्ये सावळाराम आणि जिमखाना कोवीड रुग्णालयासह भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्रा कोवीड केअर सेंटर सुरूच ठेवण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या.

कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्ण वाढत असले तरी हा नविन स्ट्रेन वाटत नाहीये. लोकल सुरू झाल्यानंतर एवढी रुग्णवाढ अपेक्षित होती असेही महापालिका आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
दरम्यान कल्याण डोंबिवलीमधील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता आरोग्य विभाग सतर्क झाला असून नागरिकांनीही कोवीड नियम काटेकोरपणे पाळण्याची गरज व्यक्त होत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा