Home ठळक बातम्या कल्याण ग्रामीणमधील भाजपच्या मातब्बर माजी नगरसेवकांसह मनसे पदाधिकाऱ्यांच्या हाती ‘शिवबंधन’

कल्याण ग्रामीणमधील भाजपच्या मातब्बर माजी नगरसेवकांसह मनसे पदाधिकाऱ्यांच्या हाती ‘शिवबंधन’

केडीएमसी निवडणुकीपूर्वीच शिवसेनेचा धमाका

कल्याण – डोंबिवली दि.22 नोव्हेंबर :
केडीएमसीच्या आगामी निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने आपले प्रतिस्पर्धी असणाऱ्या मनसेला जोरदार दे धक्का दिला आहे. भाजपच्या मातब्बर माजी नगरसेवकांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज आपापल्या पक्षांना सोडचिठ्ठी देत आपल्या हाती शिवबंधन बांधले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमूख उपस्थितीत मुंबईत हा पक्ष प्रवेश झाला.

भाजपचे कल्याण ग्रामीणमधील महेश पाटील त्यांच्या भगिनी डॉ. सुनीता पाटील आणि सायली विचारे तिन्ही माजी नगरसेवकांसह मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. प्रकृती चांगली नसल्याने डॉ. सुनिता पाटील या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमूख उपस्थितीत या सर्वांनी आपल्या हाती शिवबंधन बांधलेले पाहायला मिळाले.

आगामी केडीएमसी निवडणुकीची प्रत्यक्ष रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेने भाजप आणि मनसे या आपल्या प्रतिस्पर्ध्यावर धक्कातंत्राद्वारे एक पाऊल पुढे टाकले आहे.

 

कदाचित आम्ही कुठे तरी कमी पडलो – आमदार रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली खंत

भाजप नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशावर भाजप नेते आमदार रविंद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली असून ‘आम्ही कुठे तरी कमी पडलो’ अशी खंत व्यक्त करत त्यांनी या नगरसेवकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कल्याणात आज महाविकास आघाडी सरकारविरोधात काढलेल्या मोर्चानंतर आणि हे पक्षप्रवेश होण्यापूर्वी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपचे कार्यकर्ते, एवढी वर्षे ज्यांनी पक्षात काम केले असे काम करणारे कार्यकर्ते सोडून जातात. त्यावेळी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दुःख होत असल्याचे ते म्हणाले. तर भारतीय जनता पक्ष ते का सोडून चालले आहेत, याचे कारण त्यांनाच माहीत असावे. मात्र आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दुःख वाटते की आम्ही कुठे तरी कमी पडलो की काय? अशी खंतही आमदार चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच शिवसेना प्रवेश करणाऱ्या या नगरसेवकांना शुभेच्छाही दिल्या.

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा