डोंबिवली दि.3 फेब्रुवारी :
लोकलमध्ये विसरलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग डोंबिवली आरपीएफकडून महिला प्रवाशाला परत करण्यात आली.मंगळवारी 2 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला होता.
कल्याणात राहणाऱ्या वर्षा राऊत या लग्नानिमित्त ठाण्याला गेल्या होत्या. त्यावेळी ठाण्याहून कल्याणला परत आल्यानंतर आपली बॅग लोकलमध्येच राहिल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आरपीएफला 182 क्रमांकावर याबाबत माहिती कळवली. त्यानूसार डोंबिवली आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरफुल सिंह यादव यांनी पुढील सूत्रे हलवत वर्षा राऊत ज्या लोकलनी आल्या त्या लोकलची माहिती काढण्यास सुरुवात केली.
त्यात ही लोकल ठाकुर्ली स्थानक परिसरात सायडींगला उभी असल्याचे त्यांना समजले. त्यावर आरपीएफचे आदेश कुमार प्रधान, आरपीएफ एम.बी. हिवाळे आणि किशोर येळने यांनी ठाकुर्ली स्टेशनवर जाऊन उभ्या असणाऱ्या या लोकलमधून राऊत यांची ही दागिन्यांची बॅग शोधून काढली. बॅग मिळाल्याबाबत राऊत यांना आरपीएफने कळवत त्यांना ही बॅग पुन्हा सुपूर्द केली. सोन्याचे दागिने असणारी ही बॅग जशीच्या तशी परत मिळाल्यानंतर वर्षा राऊत यांनी आरपीएफचे मनापासून आभार मानले. तर आरपीएफने दाखवलेल्या या कार्यतत्परतेबद्दल सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.