Home ठळक बातम्या कल्याणात कॅन्सररुपी रावणाविरोधात अनोख्या ‘श्रीराम आरोग्य सप्ताहा’चे आयोजन

कल्याणात कॅन्सररुपी रावणाविरोधात अनोख्या ‘श्रीराम आरोग्य सप्ताहा’चे आयोजन

कल्याण संस्कृती मंच, आयएमए आणि अनिल कॅन्सर हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम

कल्याण दि.15 जानेवारी :
येत्या 22 जानेवारीला देशाच्या अध्यात्मिक इतिहासात प्रभू श्रीराम मंदिरानिमित्ताने एक नवा अध्याय जोडला जाणार असून त्यानिमित्ताने सर्वत्र सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आहेत. असे असताना कल्याणात मात्र आगळ्या वेगळ्या पध्दतीने आरोग्याचा जागर करणाऱ्या प्रभू श्रीराम आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण संस्कृती मंच, इंडीयन मेडीकल असोसिएशन, जीकेएसटी आणि डॉ. अनिल कॅन्सर हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे.

बदलती जीवन शैली, ताण तणाव आणि आहार यांसारख्या विविध घटकांमुळे आपल्याकडे महिलांमधील ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. यावर सध्या तरी वेळेत चाचणी आणि वेळेत निदान हाच सर्वोत्तम उपाय उपलब्ध आहे. त्यासाठी अत्याधुनिक अशा मॅमोग्राफी व्हॅनच्या माध्यमातून पुढील आठवडाभर कल्याणात विविध ठिकाणी महिलांची तपासणी केली जाणार आहे. आयएमए कल्याणच्या अध्यक्ष डॉ. ईशा पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काळा तलावजवळील मकबरा चौकातून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

महिलांमधील ब्रेस्ट कॅन्सरचे लवकर निदान होण्याच्या उद्देशाने आयएमए कल्याणतर्फे हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष डॉ. ईशा पानसरे यांनी दिली. या उपक्रमासाठी कॅन्सर तज्ञ डॉ. अनिल हेरुर यांनी त्यांची अत्यंत सुसज्ज अशी मॅमोग्राफी बस आणि टीम उपलब्ध करून दिल्याचेही डॉ. पानसरे यांनी सांगितले.

तर येत्या 22 तारखेला अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार असून त्याचे औचित्य साधून आम्ही हा आरोग्य सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला. कल्याण शहरात पुढील सात दिवस वेगवेगळ्या ठिकाणी ही मॅमोग्राफी व्हॅन फिरणार आहे. ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला त्याप्रमाणे आपण या कॅन्सररुपी रावणाचे उच्चाटन करू असा विश्वास यावेळी महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

या उद्घाटन सोहळ्याला डॉ.तेजिंदर सिंग, आयएमए कल्याणचे सचिव डॉ. विकास सुरंजे, डॉ. सोनाली पाटील, डॉ. शुभांगी चिटणीस, डॉ. स्वप्निल विसपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी संपर्क :
डॉ. शुभांगी चिटणीस, 9869307881
डॉ. स्वप्निल विसपुते 7045577767

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा