Home ठळक बातम्या केडीएमसीकडून बिल्डारांवर दाखल गुन्ह्याची ईडीने मागवली माहिती – आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे

केडीएमसीकडून बिल्डारांवर दाखल गुन्ह्याची ईडीने मागवली माहिती – आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे

 

कल्याण दि. २० ऑक्टोबर :
बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम परवानग्या मिळवणाऱ्या ६५ बिल्डरांवर केडीएमसीने काही दिवसांपूर्वी गुन्हे दाखल केले असून ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकामार्फत (SIT) त्याचा तपास सुरू आहे. त्यातच आता या प्रकरणाची दखल थेट केंद्र सरकारच्या अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीनेही(ED – Enforcement Directorate) घेतली आहे. या संदर्भात ईडीने केडीएमसी प्रशासनाला एक पत्र पाठवून या बिल्डरांवर दाखल गुन्ह्यांची माहिती मागवल्याचे केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.

बनावट कागदपत्रे सादर करून त्याच्या आधारे बांधकाम परवानग्या मिळवल्याचा धक्कादायक प्रकार काही आठवड्यांपूर्वी उघडकीस आला आहे. अशा प्रकारे बांधकाम परवानग्या मिळवून केवळ केडीएमसी प्रशासनाचीच नव्हे तर महाराष्ट्र शासनाच्या रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणजेच रेरा (Rera) या नियामक मंडळाचीही फसवणूक करण्यात आली आहे.

यासंदर्भात आर्किटेक्ट संदीप पाटील यांच्या तक्रार अर्ज आणि पाठपुराव्यानंतर त्यात तथ्य आढळल्याने केडीएमसी प्रशासनाने अशी फसवणूक करणाऱ्या ६५ बांधकाम व्यावसायिकांविरोधात तक्रार दाखल केली होती. ज्यावरून मानपाडा आणि रामनगर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडूनही या प्रकरणी तपास सुरू असताना आता यामध्ये केंद्र सरकारच्या अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी (ED) चीही एंट्री झाली आहे.

या संदर्भात केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनीही त्याला दुजोरा दिला. केडीएमसीकडून बिल्डरांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची कागदपत्रे ईडीकडून मागवण्यात आल्याचे डॉ. दांगडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा