Home ठळक बातम्या शाळांच्या बळकटीकरणासाठी कल्याणात पहिल्यांदाच अर्ध मॅरेथॉनचे आयोजन

शाळांच्या बळकटीकरणासाठी कल्याणात पहिल्यांदाच अर्ध मॅरेथॉनचे आयोजन

इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण रनर्स ग्रुपचा पुढाकार

कल्याण दि. २० ऑक्टोबर :
शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलभूत सोयींसह चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सामाजिक उद्देशाने कल्याणात पहिल्यादांच अर्ध मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण रनर्स ग्रुपच्या माध्यमातून येत्या १३ नोव्हेंबरला आयमेथॉन ३ ही अर्ध मॅरेथॉन श्रेणीची स्पर्धा होत आहे.

मुरबाड तालुक्याच्या तळेगाव गावात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मूलभूत सुविधांची वानवा आहे. निसर्गाने नटलेल्या अत्यंत सुंदर ठिकाणी ही शाळा असून इकडे शंभरहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र याठिकाणी चांगले स्वच्छता गृह आणि शाळाबाह्य वाचनासाठी आवश्यक असणारे ग्रंथालयाची नितांत गरज आहे. या दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही पुढाकार घेतला असल्याची माहिती इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली. आयमेथॉन ३ स्पर्धेच्या माध्यमातून उभा राहणाऱ्या निधीमधून या शाळेसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. तसेच उर्वरित निधीतून इतर शासकीय शाळांमध्ये आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच ही केवळ एका संघटनेची नसून संपूर्ण कल्याण शहराची मॅरेथॉन आहे. त्यामुळे धावण्यासाठी जमणार नसेल तर किमान चालण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहनही डॉ. पाटील यांनी यावेळी केले. सावळाराम होमचे संचालक निलेश केणे यांनी यंदाच्या स्पर्धेचे प्रमूख प्रायोजकत्व स्विकारले आहे.

तर कल्याण डोंबिवली क्षेत्रातील ही पहिलीच अर्ध मॅरेथॉनमध्ये असून त्यात ३ किलोमीटर, ५ किलोमीटर आणि पहिल्यांदा २१ किलोमीटर अंतराचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. येत्या १३ नोव्हेंबरला कल्याण पश्चिमेत होणाऱ्या या स्पर्धेसाठी आतापर्यंत १ हजार धावपटूंनी नाव नोंदणी केली असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा