Home ठळक बातम्या माजिवाडा ते वडपे दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे 8 दिवसांत बुजवा – केंद्रीय पंचायत...

माजिवाडा ते वडपे दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे 8 दिवसांत बुजवा – केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील

 

ठाणे, दि. 29 जुलै :
मुंबई -नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवून प्रवाशांना तातडीने दिलासा देण्याची आवश्यकता आहे. यासाठी माजिवाडा, खारेगाव नाका ते वडपे या मार्गावरील खड्डे एमएसआरडीसी (महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने बुजवावेत. तसेच ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते तेथील कामे येत्या 8 दिवसात पूर्ण करून जिल्हा प्रशासनाने समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करून त्यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज शासकीय यंत्रणांना दिले. (Fill the potholes on the road between Majiwada to Vadape in 8 days – Union Minister of State for Panchayat Raj Kapil Patil)

भिवंडी तालुक्यातील रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक वाहतूक कोंडीसंदर्भात आज कपिल पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा पोलीस प्रमुख विक्रम देशमाने, ठाणे शहर वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त डॉ. विनय राठोड, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) गोपीनाथ ठोंबरे, भिवंडी महापालिका आयुक्त अजय वैद्य, कल्याणचे उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे पाटील, भिवंडीचे उपविभागीय अधिकारी अमित सानप, महामार्ग पोलीसांचे अधिक्षक मनोज दहिकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता विलास कांबळे, यांच्यासह महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वाहतूक पोलीस आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करावीत…
पावसाळ्याच्या कालावधीत खारेगाव नाका ते मानकोली, मानकोली ते राजनोली व रांजणोली ते वडपे आणि या मार्गातील खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करून सुरळीत वाहतूक होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करावीत. एमएसआरडीएने या मार्गावरील खड्डे मास्टिक पद्धतीने बुजविण्याचे काम तातडीने पूर्ण करावे. आवश्यक तेथे जास्तीचे मनुष्यबळ कामास लावावे. दिवे, ओवळी, पिंपळास आदी ठिकाणी मोठी वाहने रस्ता ओलांडताना होणारी कोंडी दूर करण्यासाठी याठिकाणी हाईट बॅरिअर लावावेत. पाईपलाईनच्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून या कामांवर संनियंत्रण ठेवावे. वाहतूक कोंडी दूर होऊन नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी यावेळी दिले.

केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश…
सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत जड-अवजड वाहनांना बंदी घालावी, ही अवजड वाहने रात्रीच्या वेळेस पाठविण्यात यावी, दरम्यानच्या काळात दिवसा ही अवजड वाहने शहापूरमधील खर्डी येथे थांबविण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. तसेच नाशिकवरून येणारी अवजड वाहनांची वाहतूक मुरबाडमार्गे वळविण्यासंदर्भात संबंधित विभागांनी कार्यवाही करावी, माणकोली आणि रांजणोली उड्डाणपुलाखाली वळण मार्ग तयार करण्याच्या सूचनाही कपिल पाटील यांनी यावेळी शासकीय यंत्रणेला केल्या.

ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडूनही सूचना…
तर ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनीही मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी एमएसआरडीसी आणि इतर यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. तसेच या मार्गावरील कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी मार्गावरील दुरुस्तीची कामेही पूर्ण करावीत, आवश्यक तेथील अंडरपासच्या ठिकाणी दुरुस्ती करताना नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, गर्दीच्या वेळेस अवजड वाहने शहापूरजवळ थांबवून कमी गर्दीच्या वेळेस टप्प्या टप्प्याने ही वाहने सोडावीत, शहापूर ते सापगाव रस्ता दर्जोन्नत करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा