Home ठळक बातम्या वेंगुर्ल्यामध्ये असे होऊ शकते तर कल्याण डोंबिवलीत का नाही – आमदार रविंद्र...

वेंगुर्ल्यामध्ये असे होऊ शकते तर कल्याण डोंबिवलीत का नाही – आमदार रविंद्र चव्हाण

 

कल्याण डोंबिवली दि. 22 डिसेंबर :
वेंगुर्ला देशातील सर्वात जुन्या नगरपरिषदांपैकी एक. याठिकाणी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येत अत्यंत गतिमानतेने केलेली विकासकामे ही इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी रोल मॉडेल ठरत आहेत. वेंगुर्ल्यासारख्या ठिकाणी मिशन मोडमध्ये 3 ते 4 वर्षांत विकासकामे पूर्ण होतात तर मग कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत का होत नाहीत? असा सवाल डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. वेंगुर्ल्यात झालेली विकासकामे दाखवण्यासाठी त्यांनी कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगरमधील निवडक पत्रकारांचा पाहणी दौरा आयोजित केला होता. यावेळी कल्याण डोंबिवली भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. (If this can happen in Vengurla then why not in Kalyan Dombivali – MLA Ravindra Chavan)

प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही एकाच रथाची दोन चाकं आहेत. ही दोन्ही चाकं परस्पर विश्वासाने आणि सहकार्याने एकत्रितपणे चालली तर त्याचे कशाप्रकारे सकारात्मक परिणाम दिसू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे वेंगुर्ला नगरपरिषद असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्याकाळात आम्ही वेंगुर्ल्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीसाठीही मोठा निधी उपलब्ध करून दिला. मग वेंगुर्ल्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीतील विकासकामे का पूर्ण झाली नाहीत? निधी देऊन 4 ते 5 वर्षे उलटूनही अद्याप कल्याण डोंबिवलीतील विकासकामे प्रलंबित का राहिली? याचे उत्तर शोधण्याची गरज असल्याचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

 

तर इतर स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे वेंगुर्ला नगरपरिषदेलाही कोवीडचा फटका बसला. गेला वर्षे दोन वर्षे कोवीडमूळे वाया गेली. परंतु त्यानंतरही या नगरपरिषदेने अत्यंत देखणे असे नाटककार मधुसूदन कालेलकर नाट्यगृह, स्वातंत्र्यवीर सावरकर कलादालन, स्वतंत्र धरणाची निर्मिती, मच्छी मार्केटची सुसज्ज अशी 3 मजली इमारत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन, टेबल टेनिस हॉल, जलतरण तलाव,शूटिंग रेंज सेंटर, क्रिकेट अकादमी, सुसज्ज अशी व्यायामशाळा, शहरातील नागरिकांसाठी 4 सुंदर उद्यानांची निर्मिती, वेंगुर्ला मार्केटची इमारत आदी विकासकामे पूर्ण केल्याची माहिती आमदार चव्हाण यांनी दिली. ही विकासकामे केवळ करायची म्हणून नाही तर अत्यंत आखीव रेखीव,नीट नेटक्या पध्दतीने आणि सौंदर्याचा साज चढवत केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात विविध योजनांचा माध्यमातून विकासकामांसाठी कल्याण डोंबिवलीला निधी प्राप्त झाला आहे. जरी उशिर झाला असला तरी ही विकासकामे कशा पद्धतीने गतिमानतेने पूर्ण होतील याची जबाबदारी प्रशासनावर आहे. इथले महापालिका आयुक्त, कलेक्टर आणि इतर संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी एकत्र येत एक मिशन म्हणून काम केल्यास येणाऱ्या काळात निश्चितच ही कामे पूर्ण झालेली पाहायला मिळतील अशी अपेक्षा आमदार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये सध्या प्रशासकीय राजवट असून येत्या काळात केडीएमसीची सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी इच्छुक असणाऱ्या सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी निवडून आल्यावर एकदा तरी या वेंगुर्ल्याला भेट दिलीच पाहीजे. नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी किती उत्तम प्रकारे शहराचा विकास करू शकतात याचे सर्वोत्तम उदाहरण तर याठिकाणी पाहायला मिळेलच. त्याशिवाय नागरी विकासाला सौंदर्याचा साज कसा चढवला जाऊ शकतो याचाह नवा दृष्टिकोन मिळेल हे निश्चित.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा