Home ठळक बातम्या हुश्श…कल्याण डोंबिवलीत आज तब्बल ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

हुश्श…कल्याण डोंबिवलीत आज तब्बल ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

कल्याणसह बदलापूर आणि मुरबाडमध्येही पारा चाळीशीपार

कल्याण डोंबिवली दि. १० एप्रिल :
एकीकडे अवकाळी पावसामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात चढ उतार जाणवत असताना आज कल्याणात तब्बल ४० अंश सेल्सिअस आणि डोंबिवलीत ३९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर कल्याणसोबतच ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि मुरबाड तालुक्यात ४० अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली आहे.

नविन वर्षाच्या सुरुवातीपासूनच आपल्याकडे वातावरणातील लक्षणीय बदल पाहायला मिळत आहेत. कधी थंडी, कधी पावसाळा तर कधी कडक ऊन. तर गेल्या महिन्यात तर हे तिन्ही ऋतू एकाच वेळी नागरिकांना अनुभवयाला मिळाले. साधारणपणे होळीनंतर आपल्याकडे उन्हाचा पारा वाढण्यास सुरुवात होते. परंतु यंदाच्या होळीला आधी पाऊस आणि मग काहीशी थंडी असे वेगळेच वातावरण लोकांनी अनुभवले.

आज मात्र पाऱ्याने थेट चाळीशी ओलांडली आणि सर्वांनाच चांगला घाम फोडला. कल्याण , बदलापूर आणि मुरबाड या तीन तालुक्यात तापमान चाळीस अंश आणि त्यापेक्षा अधिक नोंदवण्यात आल्याचे हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी सांगितले. तसेच आजचा सोमवार हा एप्रिल महिन्यातील सर्वात उष्ण दिवस ठरल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तर गेल्या काही दिवसांपासून हळूहळू उन्हाच्या झळा जाणवू लागल्या होत्या. मार्चचा पंधरवडा तापमानाचा पारा पस्तीसच्या खाली होता. आणि एप्रिल सुरू होताच दिवसागणिक तापमान वाढून आज पाऱ्याने चाळीशी गाठली. पुढील दोन दिवस म्हणजेच १३ एप्रिलपर्यंत तापमानात उत्तर आणि उत्तर पूर्वेतून येणाऱ्या हवेच्या प्रभावामुळे अशीच वाढ अपेक्षित असल्याची माहितीही त्यांनी दिली. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शक्यतो दुपारी १२ ते ४ दरम्यान बाहेर जाणे टाळावे किवा अधिक काळजी घ्यावी आणि भरपूर पाणी पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या शहरातील आज नोंदवलेले तापमान

मुंबई ३६.७° सेल्सियस
कल्याण ४०
डोंबिवली ३९.८
बदलापूर ४०.१
मुरबाड ४१.६
कर्जत ४२.६
विरार ३७
मीरा भाईंदर ३७.३
नवी मुंबई ३९.२
मुंब्रा ३९.३
ठाणे ३९.४

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा