कल्याण दि. 3 फेब्रुवारी :
पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या भल्या मोठ्या घारीची तब्बल 4 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुटका करण्यात आली. कल्याण पूर्वेतील ड प्रभाग कार्यालयाजवळील मुख्य चौकात आज सकाळी हा प्रकार घडला.
ड प्रभाग कार्यालयाशेजारील चौकात एक पक्षी मांज्यात अडकला असल्याची माहिती कल्याण अग्निशमन दलाला मिळाली. त्यानूसार अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तर एक भलीमोठी घार मांज्यात अडकल्याचे त्यांना दिसून आले. अग्निशमन दलानेही लगेचच या घारीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र रस्त्यापासून हा मांजा बऱ्याच उंचावर असल्याने बांबूच्या सहाय्याने त्याला काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांना काही केल्या यश येत नव्हते. मग मांजा कापण्यासाठी अग्निशमन दलाने खास ड्रोनही मागवले. जेणेकरून त्याच्या पंख्यानी मांजा कापला जाईल. परंतू त्याठिकाणी असणाऱ्या इमारतींमूळे ते उडवणे शक्य झाले नाही. अखेर इमारतीच्या गच्चीवर जाऊन महत्प्रयासाने हा मांजा सैल करण्यात आला आणि तब्बल 4 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या घारीला खाली उतरवण्यात यश आले. ही घार सुखरूपपणे खाली येताच अग्निशमन दलाच्या जवानांसह उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
या घारीच्या पंखांना काहीशी इजा झाली असली तरी इतके तास मांज्यात अडकूनही ती सुखरुप असल्याचे पक्षीप्रेमींनी सांगितले.