Home क्राइम वॉच दोघा अट्टल चेन स्नॅचर्सला मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दोघा अट्टल चेन स्नॅचर्सला मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 

डोंबिवली दि. २३ मे :
ज्येष्ठ नागरिकांसह पादचारी महिलांना लक्ष्य करून सोनसाखळ्या, मंगळसूत्र, गंठण लांबवणाऱ्या दोघा अट्टल गुन्हेगारांना मानपाडा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून १५ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.

रमेश पालीवाल आणि महेश जठ अशी अटक आरोपींची नावे असून दोन्ही आरोपी मुळचे राजस्थान येथील रहिवासी आहेत. रमेश पालीवाल सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सोनसाखळी चोरीचे २९ गुन्हे ठाणे, पालघर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. कल्याणमधील खडकपाडा, कोळसेवाडी, बाजारपेठ, डोंबिवलीतील मानपाडा, टिळकनगर, विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीतही त्यांनी गेल्या काही महिन्यात सोनसाखळी चोरीचे नऊ गुन्हे केल्याची माहिती डी सी पी सचिन गुंजाळ यांनी दिली.

मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत वर्दळीच्या ठिकाणी पादचाऱ्यांना लुटणे, महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटून नेण्याच्या घटना वाढल्या होत्या. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, अनिल भिसे, सुनील तारमळे, हवालदार राजेंद्र खिलारे, विजय कोळी , दीपक गडगे, प्रवीण किनरे, महादेव पवार, यल्लप्पा पाटील, प्रशांत वानखेडे, महेंद्र मंझा, अशोक काकोडे, सुशांत तांबे, संतोष वायकर, सोमनाथ टिकेकर, भानुदास काटकर, संजु मिसाळ यांची पाच पथके गेल्या महिन्यापासून मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील कल्याण-शिळफाटा रस्ता, घरडा सर्कल, एमआयडीसी, निवासी विभाग, मानपाडा रस्ता भागात गस्त घालत होते.

एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल होती. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्या भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यात दोन जण दुचाकीवरून सोनसाखळी हिसकावून पळून जात असल्याचे दिसत होते. पोलिसांनी या दुचाकीचा वाहन क्रमांक आणि त्यावरील स्वारांची ओळख पटवत दोन्ही आरोपी भिवंडीतील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी भिवंडी भागात पंधरा दिवस पाळत ठेवत रमेश पालीवाल आणि महेश जठला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून १५ लाख २५ हजार रूपये किमतीचे ३०५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चोरीसाठी वापरलेली होंडा कंपनीची दुचाकी जप्त केल्याची माहिती डीसीपी सचिन गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा