Home ठळक बातम्या कल्याण-कर्जत, कल्याण कसारा तिसऱ्या-चौथ्या मार्गाबाबत रेल्वे मंत्रालयाने वेगाने काम पूर्ण करण्याची खासदार...

कल्याण-कर्जत, कल्याण कसारा तिसऱ्या-चौथ्या मार्गाबाबत रेल्वे मंत्रालयाने वेगाने काम पूर्ण करण्याची खासदार कपिल पाटील यांची मागणी

 

नवी दिल्ली दि.5 फेब्रुवारी:
कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जतदरम्यान प्रवाशांची संख्या वाढली असली, तरी तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. या कामासाठी भूसंपादनही झाले नसल्याने प्रवाशांचे हाल कायम असून रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारबरोबर समन्वय साधून काम वेगाने पूर्ण करण्याची मागणी भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेत शून्य प्रहरात केली.

कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जतपर्यंत तिसऱ्या मार्गाला २०११ मध्ये परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर कल्याण ते आसनगाव आणि कल्याण ते बदलापूर मार्गावर चौथा मार्गही मंजूर करण्यात आला. या भागाचे वेगाने नागरीकरण होत असून, दिवसेंदिवस प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, केवळ दोन मार्ग असल्यामुळे लोकलच्या नव्या फेऱ्या सुरू करण्यास मर्यादा आहेत. त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी लोकल थांबविल्या जातात. त्यामुळे लोकल प्रवाशांचा नाहक वेळ वाया जातो. या संदर्भात अनेक वेळा प्रवाशांनी जोरदार आंदोलने केली आहेत. प्रवाशांच्या गरजेचा विचार करता कल्याण-कर्जत आणि कल्याण-कसारा मार्गावर तिसऱ्या- चौथ्या रेल्वेमार्गाची नितांत गरज असल्याचे खासदार कपिल पाटील यांनी सांगितले.

कल्याण-आसनगाव दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेमार्गाच्या कामात अजून काहीही प्रगती झालेली नाही. त्यासाठी भूसंपादनाचे कार्य अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. तर बदलापूर-कर्जत मार्गासाठी भूसंपादनाचा केवळ आराखडा तयार करण्यात आला. त्यामुळे दोन्ही मार्गाचे काम वेगाने होण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारशी समन्वय साधावा. तसेच यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची मागणी खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेत शून्य प्रहरात केली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा