Home ठळक बातम्या दुःख,दारिद्र्य संपेपर्यंत आर्थिक जगातील लोकांना कार्य करावे लागणार – सरसंघचालक मोहन भागवत

दुःख,दारिद्र्य संपेपर्यंत आर्थिक जगातील लोकांना कार्य करावे लागणार – सरसंघचालक मोहन भागवत

कल्याणातील जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी समारंभाची सांगता

कल्याण दि.16 डिसेंबर :
जगातील दुःख, दारिद्र्य आणि शोषण जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आर्थिक जगतातील कार्यकर्त्यांना कार्य करावे लागणार असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कल्याणात व्यक्त केले. कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात ते प्रमूख पाहुणे म्हणून बोलत होते. (People of the financial world will have to work till the end of suffering and poverty – Sarsanghchalak Mohan Bhagwat)

शहरात आणि ग्रामीण भागात असलेल्या छोट्या छोट्या लोकांना पैशांची गरज असते. या लहान लहान काम करणाऱ्या लोकांच्या आर्थिक दुबळेपणाचे निवारण करणे या मूळ उद्देशानेच महाराष्ट्रात सहकारी बँकाना सुरूवात झाली. आणि लहान लहान लोकांच्या मनामध्ये परमेश्वर जागरूक असून त्यामूळे कर्ज बुडवायचाही विचार करत नाही, तो वेळेवर कर्जाची परतफेड करत असल्याचे मोहन भागवत यांनी सांगितले.

पैसा ही एक व्यवस्था आहे ती आवश्यक असली तरी ती कृत्रिम आहे. पैसा खाऊन पोट भरले जात नाही,त्यासाठी भात पोळीच खावी लागते. या सर्व व्यवस्थेमध्ये माध्यम म्हणून पैशांचा उपयोग आहे. मात्र हल्लीच्या आधुनिक जगात मुद्रा (पैसा ) महत्त्वाची होतेय आणि वस्तूचे महत्त्व घटत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी पिकवणारा शेतकरी मात्र कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत असल्याचं मतही भागवत यांनी यावेळी व्यक्त केले.

तर कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीबाबत बँकेचे अभिनंदन करतानाच मोहन भागवत यांनी काही कानमंत्रही दिले. संस्थांचे आयुष्य हे त्यांचे कार्य हेतू पूर्ण होईपर्यंत असते. आतापर्यंत आपण जशी वाटचाल करत इथपर्यंत पोहोचलो तशीच यापुढेही वाटचाल करावी लागेल अशा शब्दांत मोहन भागवत यांनी बँकेला सल्ला दिला.

यावेळी बँकेच्या ‘सुवर्ण बंध’ या स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बँकेचे अध्यक्ष सीए अजय आंबेकर, उपाध्यक्ष डॉ. रत्नाकर फाटक, व्यवस्थापकीय संचालक अनंत कुलकर्णी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा