Home ठळक बातम्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ कल्याणात राष्ट्रवादीची निदर्शने

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ कल्याणात राष्ट्रवादीची निदर्शने

 

कल्याण दि.23 फेब्रुवारी :
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीकडून झालेल्या अटकेचे पडसाद आज कल्याणातही पाहायला मिळाले. कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज संध्याकाळी निदर्शने करण्यात आली.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची आज ईडीकडून चौकशी सुरू झाली. नवाब मलिक सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले होते. त्यानंतर 8 तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्याची माहिती समोर आली आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. तर अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले नवाब मलिक हे दुसरे मंत्री असून त्याचे पडसाद मुंबईपाठोपाठ कल्याणातही उमटले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत अटकेचा निषेध केला. यावेळी नवाब मलिक यांना पाठींबा दर्शवणारे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि ईडीवर टिका करणारे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसकडून झळकवण्यात आले.

भाजपकडून महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांची भाजपकडून नाहक बदनामी सुरू असल्याची प्रतिक्रिया महेश तपासे यांनी व्यक्त केली. तसेच अशा कारवायांमूळे सरकारवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नसून महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

१ कॉमेंट

  1. वा sss !! छान !! भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अटक झाली . त्या विरुध्द रस्त्यावर ??
    मग आता राज्यात सत्ता हातात आहे तर भ्रष्टाचारास मान्यता द्या .आणि केंद्राला सांगा कि राज्य आमचे नियमही आमचेच ..
    मग ना अटक ना निदर्शनाची गरज ….

    कोर्ट आहे न्याय व्यवस्था आहे त्यावर तुमचा विश्वास नाही का ??

Leave a Reply to Rupesh Tamboli प्रतिक्रिया रद्द करा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा