Home ठळक बातम्या श्रेयवाद बाजूला ठेवून विकासकामांसाठी एकत्र या – केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील

श्रेयवाद बाजूला ठेवून विकासकामांसाठी एकत्र या – केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील

 

कल्याण दि.28 डिसेंबर :
कल्याणमध्ये नेहमीच श्रेयवाद सुरू असतो, आपण अनेकदा बघत राहतो, तू तू में में ही कल्याणात नेहमीची झालेली आहे. मात्र श्रेयवाद घेण्यापेक्षा लोकांना अपेक्षित असलेला विकास करण्यासाठी जर पुढाकार घेतला तर ते लोकांना जास्त आवडेल असे मत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले आहे. शहाड येथे पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे लोकार्पण केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

डोंबिवली-कल्याणात ज्या नागरी सुविधा असायला पाहिजे त्या यापूर्वी झाल्या नाही…

डोंबिवली किंवा कल्याणात आज ज्या काही नागरी सुविधा असायला पाहिजे होत्या त्या यापूर्वी झालेल्या नाहीत. आता सर्वच जण श्रेय घेत असतील तर लोकांना समाधान वाटेल असे लवकरात लवकर काम सुरू केल्यास जनता तुम्हाला काय दुवा देईल. जनतेला माहिती आहे कोण काम करतंय आणि कोण नाही. त्यामुळे श्रेयवाद बाजूला ठेऊन लोकांना अपेक्षित असलेले विकास करण्याचे काम सगळ्या लोकप्रतिनिधींनी करण्याचे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.

राज्य सरकारने कल्याण मेट्रोचे लवकरात लवकर टेंडर काढावे…

तर भिवंडी कल्याण मेट्रोचे अद्यापही टेंडर निघाले नसल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. ठाणे भिवंडी मेट्रोचे 70 टक्के काम भिवंडीपर्यंत झालेले आहे. परंतु भिवंडी ते कल्याण मेट्रोचे अद्याप टेंडरही निघाले नाहीये. ज्या पक्षाला आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरात सत्ता दिली तो पक्ष, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या मेट्रोचे अद्याप टेंडर काढू शकत नसल्याचे सांगितले. हे राज्य सरकार येऊन आता सव्वा दोन वर्षे झाली असून या काळात नविन सुधारित डीपीआर बनवून टेंडर बनवणे आवश्यक होते. त्यामूळे राज्य सरकार किंवा एमएमआरडीएने लवकरात लवकर सुधारित किंवा आहे त्या डीपीआरचे टेंडर काढून लवकरात लवकर कामाला सुरुवात करण्याची विनंतीही केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली. तर कल्याणकरांनी मेट्रो प्रवासाचे जे स्वप्न बघितलं आहे ते सत्यात उतरवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

राज्य सरकारकडून निधी उपलब्धतेची शाश्वती मिळत नसल्याने….

तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात शहाड येथील पादचारी पुलासह एमआरव्हीसीच्या अशा प्रकारच्या अनेक कामांना पैसे उपलब्ध करून देण्यात आले. आताही बरीचशी कामे मंजूर असूनही राज्य सरकारकडून निधी उपलब्धतेची शाश्वती मिळत नसल्याने ती रखडलेली असल्याचे त्यांनी सांगितले. तर शहाडच्या या नव्या पादचारी पुलामुळे अनेकांचे जीव वाचण्यास मोठी मदत होईल असा विश्वासही केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 28 रुग्ण तर 12 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 28 रुग्ण तर 15 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा