Home ठळक बातम्या रिंगरोड अपडेट : आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवरील कचरा उचलण्यास लवकरच सुरूवात

रिंगरोड अपडेट : आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवरील कचरा उचलण्यास लवकरच सुरूवात

रिंगरोडकरीता तब्बल ४५ मीटर जागा होणार उपलब्ध

कल्याण दि.22 डिसेंबर :
कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेल्या रिंग रोडच्या कल्याणातील कनेक्टीव्हीटीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी या महत्वाकांक्षी प्रकल्पाला गती देत रिंग रोडसाठी अडथळा ठरणारा कचऱ्याचा ढीग ताडतीने हटवण्याचे आदेश दिले. त्यानुसार डंपिंग ग्राउंडवरील कचरा हटवण्यास केडीएमसीने सुरुवात केल्याने लवकरच दुर्गाडी ते वाडेघर हा रस्ता पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Ring Road Update : Garbage collection from Aadharwadi dumping ground will start soon)

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर गेल्या ४० वर्षापासून दररोज कचरा टाकण्यात येत होता. मे २०२१ पासून आधारवाडी येथील डम्पिंग ग्राऊंडवर दैनंदिन कचरा टाकणे पूर्णत: बंद करण्यात आले आहे. डम्पिंग ग्राऊंडवर जुन्या (Legacy Waste) साठून असलेल्या कच-यावर बायोमायनिंगद्वारे विल्हेवाट लावणे आणि जागेची पुर्नप्राप्ती करुन घेणे या कामातील टप्पा क्र. १ च्या कामाचे कार्यादेश मे.नेकॉफ इंडिया लि. कंपनीला ४ डिसेंबर २०२३ रोजी देण्यात आला.

या कामासाठी “स्वच्छ भारत अभियान २.०” अंतर्गत रक्कम 42 कोटी 47 लाख ४७ रुपये शासनाने मंजूर केली केले आहेत. सद्यस्थितीत डम्पिंग ग्राऊंडवरील साठून असलेल्या कच-यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया (बायोमायनिंगद्वारे) करण्यासाठी आवश्यक मशिनरी, वे-ब्रीज इत्यादी साहित्य सामुग्री ठेवण्यासाठी बेस तयार करणे, वाहतुकीसाठी कच्चा रस्ता तयार करणे आदी कामे सुरु झाली आहेत. कच-यावर प्रक्रिया करण्याचे काम अद्याप सुरु झाले नसल्याने कुठल्याही प्रकारचा कचरा डम्पिंग ग्राऊंडवरुन बाहेर पाठविण्यात आलेला नसल्याचे केडीएमसीने स्पष्ट केले.

कच-यावर प्रक्रिया करण्याची मशिनरी आणि वे-ब्रीज बसविल्यानंतर साठलेल्या कच-यावर बायोमायनिंग पध्दतीने प्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रक्रियेनंतर Recycle Material, खत आणि रिजेक्टस् कचरा प्राप्त होणार आहे. हा रिजेक्टस् कचरा खदाणीमध्ये शास्त्रोक्त पध्दतीने टाकण्यात येणार असल्याची माहितीही केडीएमसीतर्फे देण्यात आली.

तर डंपिंगवरील या कचऱ्यावर प्रक्रिया करताना, जुना साठलेला कचरा हटविताना त्यातून निर्माण‍ झालेला मिथेन वायु बाहेर पडणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात दुर्गंधी पसरुन आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र त्यावर उपाययोजना करण्यात येणार असून कच-यावर दुर्गंधीनाशक फवारणी करण्यात येणार आहे. तसेच अग्निशमन यंत्रणाही कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे केडीएमसीने सांगितले आहे. या टप्पा क्र.१ च्या कामामध्ये डंपिंग ग्राउंडवरील सुमारे ३०% जागा मोकळी होणार असून त्यापैकी ४५ मी. जागा रिंगरोडसाठी उपलब्ध होणार आहे. परिणामी वाडेघर ते दुर्गाडी हा अवघ्या काही मीटरचा रखडलेला रस्ता पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा