Home ठळक बातम्या शिवसेना हिंदुत्वाचा डीएनए विसरली – भाजप आमदार रविंद्र चव्हाणांची टिका

शिवसेना हिंदुत्वाचा डीएनए विसरली – भाजप आमदार रविंद्र चव्हाणांची टिका

 

तर झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी परंतु त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये – शिवसेनेची प्रतिक्रिया

डोंबिवली दि.22 मार्च :
शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो असलेले बॅनर्स संपूर्ण डोंबिवली शहरात लावण्यात आले. ही फार मोठी चूक असून शिवसेना हिंदुत्वाचा डीएनए विसरली असल्याची तिखट टिका भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी केली आहे. डोंबिवलीत शिवजयंतीनिमित्त शिवसेना शहर शाखेतर्फे काल काही बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराजांऐवजी छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो छापण्यात आल्याचे समोर आल्यानंतर त्यावरून भाजप आमदार चव्हाण यांनी सेनेला लक्ष्य केले आहे.

शिवसेनेच्या सर्व उच्चपदावर असेलेल्या मंडळींचा पिंडच मुळात शिवसेनेचा नाही, दुसऱ्या पक्षातून उसनवार घेतलेली ही सर्व मंडळी आहेत. किंबहुना यांना हिंदुत्व म्हणजे नेमकं काय हे माहीतच नाही. परंतु आज एखादा खरा शिवसैनिक त्या शिवसेना शहर प्रमुखासारख्या महत्वाच्या पदावर असता तर ही चूक घडली नसती असेही आमदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

या बॅनरवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचेही नाव असून आता तरी त्यांचे डोळे उघडले आहेत की नाही हे पाहण्याची गरज असल्याचे सांगत आमदार चव्हाण म्हणाले की कदाचित खासदारांची चूक नसेलही कारण बॅनर त्यांच्या शहरप्रमुखांनी लावले होते. पण अशा पदांवर आज खरा शिवसैनिक असता तर अशी चूक झाली नसती हे मात्र नक्की असल्याचेही आमदार रविंद्र चव्हाण म्हणाले.

आपल्या रक्तात श्वासात नसानसात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. शिवरायांचं हिंदवी स्वराज्य हीच आपली ओळख आहे, असं असताना आयाराम शिवसैनिक असणाऱ्या शहरप्रमुखांनी छत्रपती शिवाजी महाराज नव्हे तर शंभूराजेंचे चित्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणून डोंबिवलीत लावले. हिंदुत्वाचा मुखवटा घालून उसनवार लोक घेऊन शिवसैनिक बनवले असल्याचे सांगत हिंदुत्वाचा अस्सल डीएनए यांच्या रक्तात येईल कुठून असा सवालही आमदार रविंद्र चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

…त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो, मात्र त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये – शहरप्रमुख राजेश मोरे

डोंबिवलीतील 1- 2 बॅनरवर नजरचुकीने छत्रपती शिवाजी महाराजांऐवजी छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो आला. त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो. मात्र त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमूख राजेश मोरे यांनी दिली.

तसेच शहरप्रमुख पदी कोणाला बसवायचे हा आपल्या पक्षाचा प्रश्न आहे. शिवसेनेकडून काल शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेली ‘न भूतो न भविष्यती’ अशी मिरवणूक बघून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असावी. आमच्या रक्तात हिंदुत्व असून त्यांनी आम्हाला शिकवू नये असेही राजेश मोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच भाजपने कधी शिवजयंती साजरी केलेली आपण पाहिले नाही. बॅनर लावले नाही. त्यामुळे अशा पध्दतीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय. अशा प्रकरणात तरी किमान राजकारण करू नये, विकासाबद्दल न बोलता विषय भरकटवण्याचा त्यांचा हा प्रयत्न असल्याचेही शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा