Home ठळक बातम्या …तर त्या १८ गावांनी केडीएमसीचा कर भरू नये – मनसे आमदार राजू...

…तर त्या १८ गावांनी केडीएमसीचा कर भरू नये – मनसे आमदार राजू पाटील यांचे आवाहन

 

कल्याण – डोंबिवली दि. १४ जून :
केडीएमसीकडून २७ गावांपैकी १८ गावांमध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाहीयेत. त्याविरोधात आम्ही या अठरा गावांमध्ये ‘ सुविधा नाही तर कर नाही ‘ असे आंदोलन सुरू करणार असून या अठरा गावांनी केडीएमसीचा कर न भरण्याचे आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी केले आहे. आमदार पाटील यांनी आज कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात विवध मुद्द्यांवर पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे आवाहन केले.

लोकांनी टॅक्स न भरण्याचे बॅनर लावणार…

२७ गावातील १८ गावांचा प्रश्न सध्या न्यायप्रविष्ट असून त्या गावांवर खूप अन्याय होतोय. कोवीड काळात केडीएमसी प्रशासनाने या १८ गावांमध्ये कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निळजे आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य सुविधा उपलब्ध झाली खरी मात्र या गावांना अत्यंत वाईट परिस्थितीतून जावे लागले. परंतू केडीएमसीकडून इमानदारीत टॅक्सेशन सुरू असल्याने यापुढे आता अठरा गावातील लोकांनी टॅक्स न भरण्याचे बॅनर लावणार असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. तसेच या गावांमध्ये ‘सुविधा नाही तर कर नाही’ असे आंदोलन घेऊन पालिकेविरोधात असहकार पुकरणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिला. आपण सांगितलेला एक साधा रस्ताही ते करत नाहीत, वारंवार सांगूनही आपल्या मागण्यांची कोणतीही दखल घेतली जात नाही. या सर्व पार्श्वभूमीवर आपण स्थानिक लोक प्रतिनिधी म्हणून या गावांतील लोकांपुढे जाऊन केडीएमसीला टॅक्स न भरण्याचे आवाहन करणार असल्याचे आमदार पाटील म्हणाले.

म्हणून आपण नालेसफाईच्या पाहणीला गेलो नाही…
कल्याण डोंबिवली महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या नालेसफाईचा बोजवारा उडाला असून लोकांना ती केवळ स्टंटबाजी वाटते म्हणून आपण त्याच्या पाहणीसाठी गेलो नसल्याची संतप्त प्रतिक्रिया आमदार राजू पाटील यांनी यावेळी दिली. केडीएमसी अधिकारी तर गेंड्याच्या कातडीचे झाले असून त्यांना आम्ही तिथे लोळवावे ही त्यांची इच्छा असली तरी आम्ही त्यांच्या या अमिषाला बळी पडणार नाही. यासाठी आपण नालेसफाईच्या दौऱ्याला आम्ही गेलो नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पालकमंत्र्यांनी असे राजकारण करू नये…
आपल्या मतदारसंघातील पाणी असो की रस्त्यांचा प्रश्न आदींबाबत भेट मिळावी म्हणून आपण सतत विनवण्या करतोय. मात्र गेल्या वर्ष दिड वर्षांपासून ते आपल्याला भेटच देत नसल्याची तक्रारही आमदार राजू पाटील यांनी यावेळी केली. तसेच नगरविकास आणि जलसंपदा खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीला आपल्याला निमंत्रित न केल्याचे सांगत आमदार राजू पाटील यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. पालकमंत्र्यांनी असे राजकारण न करता सर्वसमावेशक राजकारण केले पाहिजे असेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा