Home ठळक बातम्या दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्य देण्याचा राज्य शासनाचा निर्णय

दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्य देण्याचा राज्य शासनाचा निर्णय

मुंबई दि. 18 ऑगस्ट :

दहीहंडी उत्सवात हंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ अधिवेशनादरम्यान चर्चा करण्यात आली होती.

मृत – जखमी गोविंदांसाठी आर्थिक सहाय्य

गोविंदा पथकातील खेळाडूचा दहीहंडीच्या थरवरून पडून मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास 10 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. तर दहीहंडीच्या थरावरुन पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय किंवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला 7 लाख 50 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. तसेच दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला 5 लाख इतके आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे.

तर हा आदेश केवळ या वर्षीसाठी म्हणजेच वर्ष 2022 करताच लागू राहणार आहे. त्यासोबतच दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरविण्याबाबतही स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात विम्याचा प्रिमियम भरण्याची योजना शासन तपासत असून दहीहंडी उत्सव उद्याच असल्याने विमा योजनेच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्याने आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान कोवीडमूळे दोन वर्षांच्या खंडानंतर उद्या निर्बंधाशिवाय हा सण साजरा होतोय. परिणामी आयोजकांसोबतच गोविंदा पथकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षांत दहीहंडी फोडताना झालेल्या दुर्घटना पाहता त्यांचा विचार करून शासनाने हे अर्थ सहाय्य देण्याचे जाहीर केले आहे. मात्र शासनावर ते देण्याची आणि गोविंदा पथकातील गोविदांवर ते घेण्याची वेळ येऊ नये इतकी खबरदारी घेतल्यास या आनंदावर विरजण पडणार नाही.

 

शासनाचे अर्थ सहाय्य मिळवण्यासाठी या आहेत अटी आणि शर्थी..

दहीहंडीसाठी स्थानिक आवश्यक परवानग्या असणे गरजेचे आहे,

न्यायालय, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे आयोजक संस्था तसेच गोविंदा पथकांनी पालन करणे आवश्यक आहे,

गोविंदांच्या सुरक्षेची सर्व काळजी संस्थांनी घेतलेली असावी,

त्याचप्रमाणे पथकातील सदस्यांनी औपचारिक किंवा अनौपचारिक प्रशिक्षण घेतलेले असावे,

मानवी मनोरे तयार करण्याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे अपघात किंवा दुर्घटना झाल्यास हे आर्थिक सहाय्य दिले जाणार नाही,

गोविंदांच्याबाबतीत वयोमर्यादेचे पालन करणे बंधनकारक असून 18 वर्षाखालील सहभागी गोविंदांना आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही,

मानवी मनोरे रचताना अपघात झाल्यास गोविंदांना तात्काळ वैद्यकीय मदतीची कार्यवाही आयोजकांनी स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने करणे गरजेचे आहे,

मनोरे रचताना झालेल्या अपघाताबाबत आयोजकांनी स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणेकडे तत्काळ अहवाल देणे आवश्यक आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा