Home ठळक बातम्या गेल्या ४ दशकांपासून मृत्यूला आस्मान दाखवणाऱ्या कल्याणातील मृत्युंजयची ही प्रेरणादायी कहाणी

गेल्या ४ दशकांपासून मृत्यूला आस्मान दाखवणाऱ्या कल्याणातील मृत्युंजयची ही प्रेरणादायी कहाणी

केतन बेटावदकर

कल्याण दि.१७ ऑक्टोबर :
ऐरव्ही लहान सहान गोष्टींवरून आपण त्रस्त होतो किंवा छोट्याशा आजाराला कंटाळतो अन त्यातून सुटका (केवळ स्वतःची) करून घेण्यासाठी टोकाचे पाऊल उचलतो. मात्र सायन्सनेही ज्यापुढे गुडघे टेकले असा अत्यंत दुर्धर आजार होऊनही नाउमेद न होता पावलो पावली मृत्यूला मात देणारे तसे विरळच. आपण आज कल्याणात राहणाऱ्या अशाच एका मृत्युंजयाला भेटणार आहोत. ज्याने गेल्या चाळीस वर्षांपासून आपल्यातील जिद्द आणि इच्छाशक्तीच्या बळावर समोर उभ्या ठाकलेल्या मृत्यूलाच आस्मान दाखवले आहे.

अवघ्या १६ व्या वर्षी झाले हृदयाला छिद्र असल्याचे निदान…
खेळताना खूप जास्त दम लागतो म्हणून अवघ्या सोळाव्या वर्षी मुकुल गरे यांनी वैद्यकीय तपासणी केली आणि आलेले रिपोर्ट पाहून त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांच्या हृदयाला छिद्र असल्याचे (Ventricular Septal Defect – VSD) वैद्यकीय तपासणीमध्ये समोर आले. हृदयाच्या या छिद्रामुळे शरीरात शुद्ध ऑक्सिजन तयार होण्यास अडचण निर्माण होते. या आजारावर उपचार शक्य नसल्याने मुकुल पुढील २ वर्षे जगू शकेल असे निदान डॉक्टरांनी केले आणि मग सुरू झाला एका असामान्य लढ्याचा प्रेरणादायी प्रवास.

डॉक्टरांनी आयुष्याची दिलेली दोन वर्षांची मुदत…
हा प्रवास जितका साधासुधा वाटतो तितका तर अजिबातच नाहीये. कारण सुरुवातीच्या काळात मृत्यूच्या विचारानेच ते प्रत्येक क्षण त्याच्याच सावटाखाली जगत होते. परंतु डॉक्टरांनी दिलेली दोन वर्षांची मुदत संपली आणि मग सुरू झाले ते मृत्यू आणि मुकुल यांच्यातील द्वंद्वयुद्ध. आणि जबरदस्त इच्छाशक्ती, जिद्द आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर त्यांनी स्वतःला मृत्यूच्या दाढेतूनच बाहेर काढले नाही तर नकळतपणे इतरांसमोर जगण्याचा मोठा आदर्शही उभा केला.

येत्या २८ ऑक्टोबरला ५६ व्या वर्षांत पदार्पण…
ज्या मुलाला त्याच्या उमेदीच्या म्हणजेच अवघ्या १६ व्या वर्षी सांगितले जाते की तुमच्याकडे आयुष्याची केवळ दोनच वर्षे आहेत. ते मुकुल गरे येत्या २८ ऑक्टोबरला ५५ वर्षे पूर्ण करत आहेत. तर गेल्या दोन दशकात त्यांनी पत्रकारिता, अभिनय, मेडीकल पीआर आदी विविध क्षेत्रात नोकऱ्या केल्या आहेत.

बाहेर पडण्यापूर्वी दररोज ३ तास कृत्रिम ऑक्सिजन…
या आजाराच्या आणि मृत्यूच्या भितीने सुरुवातीला स्थळं येऊनही अविवाहित राहण्याचा निर्णय घेतलेले गरे हे चाळीशीमध्ये विवाह बंधनात अडकले. त्यांनी मुंबई महापालिकेत सहाय्यक रसायन अभियंता असणाऱ्या उषा यादवराव पाचाघरे ( माहेरचे नाव) यांच्याशी विवाह केला. आज त्यांच्या वैवाहिक आयुष्यालाही दिड दशकांचा काळ लोटला असून त्यांचा अत्यंत सुखी असा संसार सुरू असून पत्नी उषा आणि मुलगा अथर्व यांचीही तितकीच मोलाची साथ त्यांना लाभत आहे.

दिपस्तंभाप्रमाणे इतरांना करतात नकारात्मक विचारांपासून परावृत्त…
परंतू मृत्यूशी त्यांचा आजही तितकाच कळवा संघर्ष सुरूच आहे. दररोज सकाळी ३ तास कृत्रिम ऑक्सिजन घेऊनच त्यांना घराबाहेर पडावे लागत आहे. परंतु या इतक्या प्रचंड संघर्षाचा साधा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत नाही. तर मुकुल गरे यांना पहिल्यादांच भेटणाऱ्या व्यक्तीचा त्यांच्या या इतक्या कठीण भूतकाळावर अजिबात विश्वास बसत नाही. इतकी सकारात्मक ऊर्जा आणि जगण्याची प्रेरणा त्यांना भेटून मिळते. इतकेच नाही तर जे आज लहान सहान कारणांवरून आपले आयुष्य संपवण्याचा विचार करणाऱ्यांना मुकूल गरे हे दिपस्तंभाप्रमाणे नकारात्मक विचारांपासून परावृत्त करत आहेत. त्यांचा भगवान श्री कृष्ण आणि त्यांनी सांगितलेल्या भगवत गीतेवर प्रचंड श्रद्धा असून त्यामुळेच आपण थेट मृत्यूलाच परावृत्त करू शकलो असे ते सांगतात.

मुकुल गरे हे नाव आपल्याला जरी सामान्य वाटत असले तरी त्यांचा गेल्या चार दशकांचा जीवनप्रवास पाहिलात तर आपला उर अभिमानाने भरून येईल आणि आपसूकच डोळ्याच्या कडा पाणावतील. कारण हा केवळ जीवनपट नाहीये तर एका सामान्य व्यक्तीने दिलेल्या असामान्य लढ्याचा प्रेरणादायी, उर्जादायी प्रवास आहे. जो समजल्यानंतर त्यांच्या दुःखापुढे आपली स्वतःची दुःखे, अडचणी, समस्या, प्रश्न सर्व काही अत्यंत खुजे वाटू लागतील, हे नक्कीच.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा