Home ठळक बातम्या त्रिपुरी पौर्णिमा : शेकडो दिव्यांनी उजळुन निघाला ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला

त्रिपुरी पौर्णिमा : शेकडो दिव्यांनी उजळुन निघाला ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला

 

कल्याण दि.७ नोव्हेंबर :
छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी पराक्रमाचा सुवर्ण इतिहास असणाऱ्या दुर्गाडी किल्ल्याला आज वेगळीच झळाळी प्राप्त झाली होती. निमित्त होते ते आज असणाऱ्या त्रिपुरी पौर्णिमेचे. त्रिपुरी पौर्णिमा उत्सव समितीतर्फे गेल्या सहा दशकांहून अधिक काळापासून दुर्गाडी किल्ल्यावर हा दिपोत्सव साजरा केला जात आहे.

गेली दोन वर्ष कोवीडमूळे सगळ्याच सण उत्सवांवर संक्रांत आली होती. मात्र आता कोवीड रुग्णसंख्या नगण्य होण्यासह सर्व निर्बंधही उठवण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षी सर्वच सण उत्सव अतिशय उत्साहात साजरे झाले. त्याचीच पुनरावृत्ती आजच्या या दुर्गाडी किल्ल्यावर झालेल्या दिपोत्सवातूनही दिसून आली.

दुर्गाडी किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून सुरू झालेली अत्यंत सुंदर अशी पणत्यांची आरास ही किल्ल्यावरील दोन्ही बुरुज, पायऱ्या, मंदिराचा चौथरा आणि मंदिराच्या कळसापर्यंत करण्यात आली होती. एकीकडे या पणत्यांच्या सुवर्ण झळाळी तर दुसरीकडे नभांगणामध्ये मंद प्रकाशात तेवणारा पूर्ण चंद्र. अशा दुग्धशर्करा योगात ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला अक्षरशः न्हाऊन निघाला होता.

या सुवर्ण क्षणाचे ‘याची देही याची डोळा ‘ असे साक्षीदार होण्यासाठी आणि हा सुवर्ण क्षण मनात साठवून ठेवण्यासाठी कल्याणकर नागरिकांनी गर्दी केली नसती तरच नवल. संध्याकाळपासून अनेकांनी दुर्गाडी किल्ल्यावर मोठी गर्दी केली होती.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा