Home ठळक बातम्या आंबिवली स्मशानभूमीत शेडविनाच अंत्यसंस्कार ; पावसामुळे वारंवार द्यावा लागतोय अग्नी

आंबिवली स्मशानभूमीत शेडविनाच अंत्यसंस्कार ; पावसामुळे वारंवार द्यावा लागतोय अग्नी

गेल्या ५ वर्षांपासून स्मशानभूमी आहे छताच्या प्रतीक्षेत

कल्याण दि. २७ जुलै :
“इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते” सुरेश भट यांच्या या ओळी सर्वश्रुत आहेतच. मात्र आंबिवली येथील स्मशानभूमीमध्ये होणारे अंत्यसंस्कार पाहिल्यानंतर इथल्या मृतदेहांना मरणानंतरही यातना सहन कराव्या लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आंबिवली गावातील स्मशानभूमीमध्ये पत्र्याच्या शेडअभावीच अंत्यसंस्कार करावे लागत असून तर पावसाळामुळे वारंवार अग्नी द्यावा लागत असल्याची व्यथा स्थानिकांनी मांडली आहे.

आंबिवली गावामध्ये स्मशानासाठी जागा नसल्याने 5 वर्षांपूर्वी स्थानिक तरुणांनी एकत्र येत लोक वर्गणीतून नदीकिनारी असणाऱ्या जागेवर स्मशानभूमीसाठी पायाभरणी केली. तसेच जमा झालेल्या निधीमध्ये प्रेत जाळण्यासाठी आवश्यक चौथरा बांधत शेड टाकण्यासाठी सिमेंटचे खांबही उभे केले. मात्र उर्वरित बांधकामासह पत्र्याचे शेड उभे करण्यास निधी कमी पडल्याने पूढील सर्व काम ठप्प झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. परिणामी याठिकाणी गेल्या ५ वर्षांपासून शेडविनाच अंत्यसंस्कार होत आहेत. विशेषतः पावसाळ्यात तर इथल्या प्रेतांची अधिकच हेळसांड होत असून कित्येकदा पावसाळ्यात अर्धे प्रेत जळून विझून गेलेले असते. परिणामी पाऊस थांबल्यावर पुन्हा अग्नि द्यावा लागत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान या स्मशानभूमीमध्ये पत्रे बसवण्यासाठी स्थानिक लोप्रतिनिधींनी आश्वासने दिली होती. परंतू अद्याप त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांना बहुधा वेळ मिळालेला दिसत नाहीये. मात्र आपापसातील हेवेदावे विसरून या स्मशानभूमीचे अर्धवट राहिलेले काम यावर्षी तरी पूर्ण करावे इतकीच भाबडी आशा इथले स्थानिक रहिवासी व्यक्त करत आहेत.

फोटो – माहिती सौजन्य – विनोद शिंदे , एल एन एन सिटीजन रिपोर्टर

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा