Home ठळक बातम्या शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून कल्याणात घंटानाद आंदोलन; लालचौकी परिसरात पोलिसांनी धरले रोखून

शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून कल्याणात घंटानाद आंदोलन; लालचौकी परिसरात पोलिसांनी धरले रोखून

कल्याण दि.२९ जून :

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेकडून दुर्गाडी किल्ला परिसरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून एकापाठोपाठ एक हे आंदोलन झाल्याचे दिसून आले.

आज सकाळीच एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते घंटानाद आंदोलनासाठी लालचौकी परिसरात जमले होते. दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना लालचौकी परिसरात रोखून धरले. यासाठी लालचौकी परिसरात पोलिसांनी बॅरिकेड्स उभारले होते. तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी सतर्कतेचा उपाय म्हणून दुर्गाडी किल्ला परिसरातही मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

यावेळी शिवसेनेत फूट पडून शिंदे गट(शिवसेना) आणि ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाल्यामुळे दोन्ही गटांचे कार्यकर्ते या आंदोलनासाठी लालचौकी परिसरात जमा झाले होते. जमलेल्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केले. मात्र पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

साडेतीन दशकांहून अधिक जुन्या या घंटानाद आंदोलनाचा हा आहे इतिहास…

ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरील शिवसेनेच्या या घंटानाद आंदोलनाला सुमारे 37 वर्षांचा इतिहास आहे. १९८६ साली धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने किल्ल्याच्या बाहेर घंटानाद आंदोलन सुरू केलं. तेव्हापासून दरवर्षी किल्ल्याच्या परिसरात हे आंदोलन शिवसेनेकडून केलं जात आहे. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही या आंदोलनाला उपस्थित राहत पाठींबा दर्शवला होता.

दरम्यान बकरी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी दुर्गाडी किल्ला परिसरात नमाज पठण करत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा