Home ठळक बातम्या विठ्ठल – रुख्मिणीच्या गजरात न्हाऊन निघाली कल्याण नगरी

विठ्ठल – रुख्मिणीच्या गजरात न्हाऊन निघाली कल्याण नगरी

कल्याण आयएमए आणि बिर्ला कॉलेजकडून भव्य दिंड्यांचे आयोजन

कल्याण दि.२९ जून :
आज आषाढी एकादशी. संपूर्ण महाराष्ट्र विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाला असतानाच कल्याण नगरीही विठ्ठल रुक्मिणीच्या नामघोषात न्हाऊन निघाल्याचे दिसून आले. इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याण आणि बिर्ला कॉलेजच्या माध्यमातून कल्याणात भव्य दिंड्या काढण्यात आल्या. विशेष म्हणजे या दोन्ही दिंड्यांमध्ये सहभगी झालेल्या वारकऱ्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश देण्यात आले.

कल्याण आयएमएच्या दिंडीद्वारे “प्लॅस्टिकमुक्त कल्याण”चा संकल्प…

इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याण, कल्याण संस्कृती मंच आणि नूतन विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या या दिंडीच्या माध्यमातून “प्लॅस्टिकमुक्त कल्याण” हा सामाजिक संदेश देण्यात आला. तत्पूर्वी कल्याण संस्कृती मंचचे अध्यक्ष ॲड. निशिकांत बुधकर, केडीएमसी सचिव संजय जाधव, डॉ. सुरेश एकलहरे, प्रा. अशोक प्रधान, माजी नगरसेवक गणेश जाधव, हृदयनाथ भोईर आदी मान्यवरांच्या हस्ते या पालखीचे पूजन करण्यात आले.

नूतन विद्यालयापासून निघालेली ही दिंडी संतोषी माता रोड, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पौर्णिमा चौक, मुरबाड रोड मार्गे पुन्हा नूतन विद्यालयामध्ये येऊन समाप्त झाली. ज्यामध्ये नूतन विद्यालयाच्या विद्यार्थी आणि शिक्षक वर्गासह कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा भागातील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. तर डॉ. विकास आणि डॉ. लीना या सुरंजे दांपत्याने साकारलेली विठोबा – रखुमाई सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती.

आगामी गुढीपाडवा स्वागतयात्रेचे यजमानपद यंदा इंडीयन मेडीकल असोसिएशन भूषविणार आहे. कल्याण संस्कृती मंचच्या माध्यमातून निघणाऱ्या या नववर्ष स्वागतयात्रेचे यंदा रौप्य महोत्सवी अर्थातच २५ वे वर्ष आहे. या रौप्य महोत्सवी वर्ष स्वागत यात्रेच्या आयोजनाची जबाबदारी इंडीयन मेडीकल असोसिएशनकडे सोपवण्यात आली आहे. हॅपिनेस इंडेक्स या थीमवर ही स्वागतयात्रा आधारित असणार आहे. ज्यामध्ये कल्याणातील ५ लाख नागरिकांचा सहभाग लाभेल अशी अपेक्षा आयएमए कल्याणचे माजी अध्यक्ष आणि केडीएमसीचे ब्रँड अँबेसेडर डॉ. प्रशांत पाटील यांनी व्यक्त केली.

तर त्याचा पहिला अध्याय म्हणून आज आषाढी एकादशीनिमित्त निघालेल्या या आनंदवारीमध्ये सुमारे ५०० नागरिक सहभागी झाले होते. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बने आदींचे ही दिंडी यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य लाभल्याचे डॉ. प्रशांत पाटील म्हणाले.

आजचा हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी कल्याण आयएमएच्या अध्यक्ष डॉ. ईशा पानसरे, डॉ. अमित बोटकुंडले, डॉ. आश्विन कक्कर, डॉ. सुरेखा इटकर आदीनी विशेष मेहनत घेतली. दरम्यान मुरबाड रोडवरून ही पालखी जात असताना त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या मुस्लिम बांधवांना डॉ. प्रशांत पाटील यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा देत सामाजिक सलोखा जपल्याचे दिसून आले.

बिर्ला कॉलेजच्या ज्ञान दिंडीमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाचा जागर

तर आजच्या आषाढी एकादशीनिमित्त सेंच्युरी रेयॉन, बी.के. बिर्ला कॉलेज, बी.के. बिर्ला नाईट कॉलेज, बी.के. बिर्ला पब्लिक स्कूल आणि सेंच्युरी रेयॉनच्या संयुक्त विद्यमाने ज्ञान दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये निसर्ग संवर्धन- स्वच्छतेच्या प्रबोधनासोबतच श्री विठोवा- रुक्मिणीच्या भक्तीभावाचे दर्शन झाले. बिर्ला कॉलेजच्या प्रांगणातून सुरू झालेली ही ज्ञान दिंडी प्रेम ऑटो, शहाड पुलामार्गे शहाड येथील विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात आली.

यावेळी दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त पोलीस कल्याण आयुक्त, भाजप कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुख नरेंद्र पवार, आमदार गणपत गायकवाड, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आमदार कुमार आयलानी, महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओ.आर. चितलांगे, उपाध्यक्ष सुबोध दवे, संचालक डॉ.नरेश चंद्र, प्राचार्य डॉ.अविनाश पाटील, सेंच्युरी रेयॉनचे युनिट हेड दिग्विजय पांडे आदी मान्यवर सहभागी झाले होते.

तर या ज्ञानदिंडीतील रथावर विराजमान विठ्ठल आणि रुक्मिणीसह सजवलेल्या पालख्या, ढोल पथक, लेझीम पथक, एम पॉवर आणि योग पथकांचीही लक्षणीय उपस्थिती होती. हजारो भाविकांची भजन मंडळी वारकरी कीर्तनाच्या तालावर नाचत पुढे सरकत होती. तसेच या दिंडीत कल्याण परिसरातील शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्थांव्यतिरिक्त हजारो स्थानिक वारकरी भाविकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा