Home ठळक बातम्या कल्याणच्या चाळीत राहणारी चिमुकली हर्षदा झालीय स्टार

कल्याणच्या चाळीत राहणारी चिमुकली हर्षदा झालीय स्टार

 

कल्याण दि.९ जून :
चाळ…समाजातील राहण्याचे असे ठिकाण ज्याच्याबद्दल अनेकांच्या मनामध्ये आजही काही गैरसमज आहेत. मात्र कल्याणच्या एका ८ वर्षांच्या चिमुरडीने हे सर्व गैरसमज खोडून काढत अशी काही गगनभरारी घेतली आहे की तिचे करावे तितके कौतुक कमीच ठरेल.

हर्षदा विक्रम कांबळे, वय वर्षे अवघे ८ असले तरी इतक्या लहान वयातच तिच्या पंखांनी अवकाश कवेत घेण्यास सुरुवात केली आहे. कल्याण पूर्वेच्या सूचक नाका परिसरात भीमनगर चाळीमध्ये हर्षदा आपल्या कुटुंबीयांसोबत राहते. चाळीतल्या मुलांना योग्य दिशा दिली तर त्यांच्यातही भरपूर कलागुण लपलेले असतात हे हर्षदाने आपल्या कर्तुत्वाने दाखवून दिले आहे. हर्षदाने अनेक मराठी टिव्ही सिरीयल आणि चित्रपटांमध्ये बालकलाकाराची भूमिका केली आहे.
सुप्रसिद्ध मराठी सिरीयल माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत परीच्या मैत्रिणीची भूमिका हर्षदा कांबळेने साकारली आहे.

हर्षदाचे वडील हे ठाणे येथे पंचकर्मा केंद्रात काम करतात. तिच्या वडिलांना कलेची आवड असल्याने वेळ मिळेल तेव्हा ते छोट्याखानी कार्यक्रमात निवेदन आणि गाणी सादर करतात. त्यावेळी हर्षदालाही सोबत घेऊन जात असे. त्याच वेळी तिला या सगळ्याची आवड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तिला डोंबिवली येथे डॉ. ज्ञानेश्वर सकपाळ भरवत असलेल्या बालनाट्य शिबिरात पाठवले. या शिबिरातच तिने अभिनयाचे प्रथम धडे गिरवले.

एका नामांकित मराठी वाहिनीवर सुरू असणाऱ्या माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेसाठी ठाणे येथे ऑडिशन सुरू असल्याचे तिची आत्या मीना कांबळे यांना समजले. आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता हर्षदाला त्या ऑडिशनला नेले. आणि तिच्यातील स्पार्क बघून या सिरीयलसाठी तिची निवडही झाली. मग त्यानंतर हर्षदाला रंग माझा वेगळा, येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकांमध्येही छोट्या भूमिका करण्याची संधी मिळाली. लव्ह कनेक्शन नावाचा एक हिंदी सिनेमाही तिने केला असून शूटिंगनिमित्ताने तिला अंधेरी, दहिसर, गोरेगाव, ठाणे येथे घेऊन जात असल्याची माहिती आत्या मीना कांबळे यांनी दिली.

तर आपल्याला तिला कॅमेरा समोर अक्टिंग करताना खूप मजा येत असल्याचे हर्षदाने सांगितले. लावणी करायलाही तिला आवडत असून तिने आतपर्यंत विविध स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसांवर आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे या 8 वर्षाच्या चिमुरडीने आपल्या कामातून चाळीतल्या इतर मुलांनाही प्रेरणा दिली आहे.

दरम्यान हर्षदाच्या अभिनय क्षेत्रातील या उत्तुंग भरारीबद्दल नाशिकमध्ये जाहीर सोहळ्यात तिचा सन्मान केला जाणार आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा