Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीला हुडहुडी ; पारा आला १२-१३ अंशांवर

कल्याण डोंबिवलीला हुडहुडी ; पारा आला १२-१३ अंशांवर

तर बदलापूरमध्ये सर्वात कमी १० अंश सेल्सिअस तापमान

कल्याण-डोंबिवली दि.१० डिसेंबर :

अचानकपणे गायब झालेला गारठा कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा अवतरला असून काल रात्रीपासून कल्याण डोंबिवलीला हुडहुडी भरलेली पाहायला मिळाले. कल्याण डोंबिवलीमध्ये आज किमान तापमानात लक्षणीय घट होऊन कल्याणात १२.८ आणि डोंबिवलीमध्ये १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर बदलापूरमध्ये सर्वात कमी म्हणजेच १०.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

गेल्या म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात कल्याण डोंबिवलीमध्ये सर्वात कमी तापमान नोंदवले गेले होते. त्यानंतर आजच्या दिवशी यंदाच्या मौसमातील आतापर्यंतच्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनला दिली.

उत्तरेकडील कोरड्या हवेमुळे घसरलेल्या आर्द्रतेचा परिणाम…
अचानकपणे हे तापमान घटण्यामागे उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या हवेमुळे आर्द्रता लक्षणियरित्या कमी झाली आहे. या कोरड्या हवेमुळे काल शुक्रवारी ऐरव्ही ३०-४० टक्के असणाऱ्या हवेतील आर्द्रतेचे प्रमाण केवळ १५ टक्क्यांवर आले होते. परिणामी आकाश स्वच्छ आणि निरभ्र झाल्याने तापमान कमी होण्यास मोठी मदत झाली.

मात्र ही थंडी फार काळ टिकणार नाही…
काल रात्रीपासून आपल्याकडे काहीसा गारवा जाणवत असला तरी बदलत्या हवामानामुळे ही थंडी फार काळ टिकणार नसल्याची महत्वपूर्ण माहितीही मोडक यांनी एलएनएनशी बोलताना दिली. उद्यापासून म्हणजेच रविवारपासून हवेची दिशा बदलणार असल्याने तापमान पुन्हा वाढणार आहे. तामिळनाडू येथील किनारपट्टीवर धडकलेले चक्रीवादळाने पश्चिमेला अरबी समुद्राच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली आहे.

पण हे चक्रीवादळ क्षीण होऊन वरच्या हवेतील चक्राकार प्रणाली म्हणुन कर्नाटक किनारपट्टीच्या जवळपासच कार्यान्वित राहील. ज्याचा परिणाम वाऱ्याची दिशा बदलून आणि वरच्या हवेच्या चक्रकार पद्धतीत बदल होऊन आपल्याकडे बाष्पयुक्त हवेचे वातावरण निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दक्षिण पूर्व किंवा दक्षिणेकडून वाष्पयुक्त वारा आभाळ घेऊन आल्याने राज्यात पावसाची शक्यता निर्माण होईल असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

पुढील ३ दिवस ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता…
आज जरी आपल्याकडे आकाश निरभ्र दिसत असले तरी या चक्रीवादळामुळे येत्या २४ तासांत त्यात बदल होऊन ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस ठाणे जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता असल्याचे अभिजीत मोडक यांनी स्पष्ट केले.

ठाणे जिल्ह्याच्या भागात दुपार – संध्याकाळच्या सुमारास हलक्या ते मध्यम सरी आणि गडगडाटी पावसाचे वातावरण तयार झाल्यास मध्यम ते जोरदार सरी कोसळू शकतात. २३ ऑक्टोबरच्या काळात मान्सून माघारी परतल्याने संपूर्ण नोव्हेंबर कोरडा आणि थंड होता. मात्र या चक्रीवादळामुळे वातावरण बदल होऊन पुढील तीन दिवस पावसाळी वातावरण तयार झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

सोमवारपासून वातावरणामुळे बदल होऊन किमान (mini)तापमान वाढणार असले तरी ढगाळ वातावरणामुळे कमाल (max) तापमानातही एक दोन दिवस घट झालेली पाहायला मिळू शकते असे अभिजीत मोडक यांनी सांगितले.

आज नोंदवले गेलेलं किमान तापमान

बदलापूर – १०.२
कल्याण १२.८
डोंबिवली १३.४
उल्हासनगर १२.४
कर्जत – १०.४
ठाणे – १५.४
नवी मुंबई – १५.६
मुंबई – १६.५

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा