Home ठळक बातम्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महापुरुषांचे अपमान – सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महापुरुषांचे अपमान – सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप

कल्याण पूर्वेतील महाप्रबोधन यात्रेच्या जाहीर सभेत सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र

कल्याण दि.9 डिसेंबर :
सध्या राज्याच्या राजकारणात महापुरुषांचा सुरू असणारा अपमान हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतूत्वाखाली होत असल्याचा गंभीर आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कल्याणात केला. कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावर झालेल्या महाप्रबोधन यात्रेच्या जाहीर सभेमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून भाजपसह सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडले.

…त्यानंतरही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री का शांत ?
गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये महापुरुषांचे अपमान करून महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवली जात असतानाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साधा निंदाजनक ठरावही मांडत नाही असे सांगत अंधारे यांनी यावेळी टिका केली. तर महाराष्ट्राचा इतका अपमान सुरू असतानाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शांत का बसले आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मग सावरकरांना अद्याप भारत रत्न का नाही.?
तर एकीकडे भाजपकडून सतत सावरकर प्रेम दाखवले जात असताना तिकडे गुजरातमध्ये मात्र काँग्रेसचे नेते सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा का उभारला गेला? तुम्हाला सावरकर इतके प्रिय होते तर त्यांना भारतरत्न का नाही दिला नाही? असे प्रश्न त्यांनी भाजप नेत्यांना यावेळी विचारले. तर ज्या पद्धतीने सदाभाऊ खोत, पंकजा मुंडे, बच्चू कडू यांची अवस्था झाली आहे तशीच अवस्था शिवसेना सोडून गेलेल्या या 40 जणांची होणार आहे.
आपले 40 भाऊ कॉपी करून पास झाले असून त्यांना हे कळत नाही की सरकारमध्ये सगळी मलिद्याची खाती भाजपकडे गेली आहेत. आणि माझ्या भावांकडे मात्र सगळी कपडे फाडण्याची खाती असल्याची मिश्किल टिकाही अंधारेंनी यावेळी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री…
तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नसून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून त्यांच्याच इशाऱ्याने हे सरकार चालत आहे. नुकत्याच झालेल्या समृद्धी महामार्गाच्या पाहणीदरम्यान गाडीचे स्टिअरिंग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती दिसले. यावरून हेच अधोरेखित होत असल्याची टीकाही सुषमा अंधारे यांनी यावेळी केली.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचे पाहायला मिळेल..
महाप्रबोधन यात्रेला राज्यात प्रतिसाद चांगला मिळत आहे. हा प्रतिसाद पाहता आम्हाला खात्री आहे की येत्या निवडणुकीत उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतानाचे चित्र पाहायला मिळेल, असा विश्वासही अंधारे यांनी यावेळी व्यक्त केला.

लाव रे तो व्हिडिओ…
यावेळी सुषमा अंधारे यांनी या सभेमध्ये भाजपसह सत्ताधाऱ्यांमधील विविध नेत्यांचे छोटे छोटे व्हिडीओ लावून सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर किरीट सोमय्या यांनी ज्या ज्या नेत्यांवर आरोप केले, त्यांच्या भाजपा प्रवेशानंतर आता चौकशा कशा काय थांबल्या ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी सुषमा अंधारे यांच्यासह उपनेते शरद कोळी यांच्यासह शरद पाटील, हर्षवर्धन पालांडे, सदानंद थरवळ, विवेक खामकर, सचिन बासरे, बाळ हरदास, अल्ताफ शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा