Home ठळक बातम्या कल्याण जनता सहकारी बँकेचा पुढील आठवड्यात ‘सुवर्ण महोत्सवी शुभारंभ सोहळा’

कल्याण जनता सहकारी बँकेचा पुढील आठवड्यात ‘सुवर्ण महोत्सवी शुभारंभ सोहळा’

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रा.स्व. संघाचे कोकण प्रांत संघचालक डॉ. सतीश मोढ यांची प्रमुख उपस्थिती

कल्याण दि. १८ डिसेंबर :
सहकार क्षेत्रातील अग्रेसर आणि ख्यातनाम बँक अशी ओळख निर्माण केलेली कल्याण जनता सहकारी बँक आपल्या सुवर्ण महोत्सवी म्हणजेच ५० व्या वर्षात पदार्पण करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संघचालक डॉ. सतीश मोढ यांची प्रमुख उपस्थितीत सुवर्ण महोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळा होणार असल्याची माहिती आज बँकेतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली. बँकेचे अध्यक्ष सचिन आंबेकर, एमडी आणि सीईओ अतूल खिरवाडकर, उपाध्यक्ष डॉ. रत्नाकर फाटक यावेळी उपस्थित होते.

सत्तरच्या दशकात कल्याण पीपल्स को – ऑप बँक बुडाली होती. या पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्रातील धुरीण स्व. माधवराव गोडबोले यांच्या प्रेरणेने २३ डिसेंबर १९७३ मध्ये कल्याण जनता सहकारी बँकेची स्थापना झाली. सुरुवातीला टिळक चौकातील देवधर सदन इथल्या १८० चौरस फूट जागेमध्ये केवळ ५० हजारांचे भाग भांडवल आणि ८० हजार रुपयांच्या ठेवींनी बँकेची मुहूर्त मेढ रोवली गेली. येत्या २३ डिसेंबर २०२२ ला बँक एकोणपन्नास वर्षे पूर्ण करून ५० व्या वर्षांत पदार्पण करत आहे.

त्यानिमित्त कल्याणातील आचार्य अत्रे नाट्यगृहात सुवर्ण महोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संघचालक डॉ. सतीश मोढ, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सचिन आंबेकर यांनी दिली.

तर आतापर्यंत बँकेचा गुजरातच्या सुरतमधील शाखेसह राज्याभरामध्ये ४३ शाखांद्वारे ५ हजार कोटींच्या वर व्यवसाय सुरू आहे. तर बँकेचे ६० हजार सभासद आणि ३ लाखांहून अधिक ग्राहक असून गेल्या ४९ वर्षांपासून म्हणजेच स्थापनेपासूनच कल्याण जनता सहकारी बँक नफ्यात असल्याची माहिती एमडी आणि सी ई ओ अतूल खिरवाडकर यांनी दिली.

तसेच सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा विचार करता बँकेकडून काळानुरूप बदल करत ग्राहकांना नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आदींसारख्या अद्ययावत सेवा पुरवल्या जात आहेत. तर सायबर क्राईमचे वाढते प्रकार पाहता सुरक्षित ऑनलाईन व्यवहारांच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाय योजनाही राबवल्या जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

तर सामाजिक जाणिवेच्या भावनेतून बँकेकडून दरवर्षी आपल्या नफ्यातील १ टक्के रक्कम वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्थांना दिली जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. तर या ४९ वर्षांच्या कार्यकाळात बँकेला अनेक नामवंत संस्थांकडून गौरवण्यात आले आहे. त्यातही २०१३-१४ मध्ये कोकण विभागातील नागरी सहकारी बँकांच्या गटामध्ये राज्य सरकारतर्फे देण्यात आलेला सहकार भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बँकेकडून येत्या काळात विविध योजना सुरू करण्याचाही बँकेचा मानस असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा