Home ठळक बातम्या कल्याणातील श्री स्वामी समर्थ मठाच्या मोडक महाराजांच्या अपघाती निधनाने हजारो भक्तांवर शोककळा

कल्याणातील श्री स्वामी समर्थ मठाच्या मोडक महाराजांच्या अपघाती निधनाने हजारो भक्तांवर शोककळा

 

कल्याण दि. २० डिसेंबर :
कल्याणसह मुंबई आणि कोकण परिसरात श्री स्वामी समर्थांच्या १७ मठांची स्थापना करत अध्यात्मिक वारसा जपणाऱ्या नवनित्यानंद अर्थातच मोडक महाराज यांच्या अपघाती निधनाने हजारो भक्तांवर शोककळा पसरली आहे. सोमवारी सकाळी कोल्हापूर महामार्गावर हा भीषण कार अपघात झाल्याची माहिती आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच हजारो भक्तगण काल रात्रीपासूनच कल्याण पश्चिमेतील श्री स्वामी समर्थ मठामध्ये दाखल झाले आहेत.

मोडक महाराजांनी कल्याणसह मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना करत हजारो भक्तांना अध्यात्मिक प्रवाहात आणण्यासाठी मोठे योगदान दिले. नामस्मरण, सेवाभाव, कुळाचाराद्वारे ईश्वरसेवा करत आपले संस्कार आणि संस्कृती जोपासून अध्यात्मिक प्रगतीच्या त्यांनी दाखवलेल्या अवीट मार्गावर आज हजारो भक्तगण यशस्वीपणे वाटचाल करत आहेत. तर अनेक दिशाहीन आणि मूळ मार्गावरून भरकटलेल्या व्यक्तींना त्यांनी दिपस्तंभाप्रमाणे अंधारातून अध्यात्मिक प्रवाहाच्या उजेडामध्ये आणत प्रकाशमान केले.

कल्याणच्या या मठामध्ये साधारणपणे गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मोडक महाराज कार्यरत होते. भक्ती, प्रेम ,त्याग, शिस्त, ज्ञान आदी गुणांचा अभूतपूर्व संगम म्हणून अनेक भक्तगणांच्या हृदयात त्यांचे अढळ स्थान होते. या पार्श्वभूमीवर मोडक महाराजांच्या अशा अकाली अपघाती निधनाने भक्तगणांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान आज सकाळी मोडक महाराजांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी मठामध्ये ठेवण्यात येणार असून काल रात्रीपासूनच शेकडो भक्तगण याठिकाणी जमा झाले आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा