Home ठळक बातम्या गणेशोत्सवापूर्वी तरी कल्याण डोंबिवलीतील रस्ते खड्डेमुक्त करा; माजी लोकप्रतिनिधींची केडीएमसी आयुक्तांना साद

गणेशोत्सवापूर्वी तरी कल्याण डोंबिवलीतील रस्ते खड्डेमुक्त करा; माजी लोकप्रतिनिधींची केडीएमसी आयुक्तांना साद

गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे पालिका आयुक्तांचे आश्वासन

कल्याण – डोंबिवली दि.22 ऑगस्ट :
कल्याण डोंबिवलीतील नागरिक खड्ड्यांमुळे गेल्या एक दिड महिन्यापासून अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असताना कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेच्या माजी लोकप्रतिनिधींनी आज केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासोबत बैठक घेतली.

कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून त्यामुळे नागरिकांना पाठदुखीसह इतर आजारांना तोंड द्यावे लागत आहे. तर गणेशोत्सवापूर्वी कल्याण डोंबिवलीतील रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा केडीएमसी प्रशासनाने केली होती. तसेच रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यासाठी अंदाजे 15 कोटींची तरतूदही केली होती. मात्र गणेशोत्सवाला अवघा आठवडा शिल्लक राहिला असताना अद्यापही रस्त्यांवरील खड्डे जैसे थे आहेत. त्याचजोडीला कल्याण डोंबिवलीतील कचऱ्याची समस्या पुन्हा एकदा उग्र रूप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेच्या अनेक माजी नगरसेवक आणि नगरसेविकांनी आज केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासोबत बैठक घेत आपली कैफियत मांडली. या बैठकीला केडीएमसीचे सर्व प्रमूख अधिकारीही उपस्थित होते.

गणेशोत्सवापूर्वी कल्याण डोंबिवलीला खड्डेमुक्त करणार – आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे
या बैठकीबाबत प्रसिद्धीमाध्यमांनी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना विचारले असता त्यांनी, गणेशोत्सवापूर्वी कल्याण डोंबिवलीतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करू असे आश्वासन दिले. तसेच शहरातील खड्डे भरण्याचे काम सुरू झाले आहे. पावसाची थोडीशी उघडीप मिळाल्यास गणेशोत्सवापूर्वी शहरातील वाहतूक सुरळीत होईल असे आपण माजी लोकप्रतिनधी आणि पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचे ते म्हणाले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा