Home ठळक बातम्या मेट्रोचा विस्तार टिटवाळ्याच्या महागणपती मंदिरापर्यंत करावा – आमदार विश्वनाथ भोईर

मेट्रोचा विस्तार टिटवाळ्याच्या महागणपती मंदिरापर्यंत करावा – आमदार विश्वनाथ भोईर

 

मुंबई दि.२३ ऑगस्ट :
राज्य शासनाच्या कल्याणपर्यंत प्रस्तावित मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा विस्तार टिटवाळा येथील महागणपती मंदिरापर्यंत करावा अशी मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मुंबईत सुरू असणाऱ्या पावसाळी अधिवेशनात केली आहे.

कल्याण पश्चिम मतदारसंघात गावठाण परिसर सोडल्यास उर्वरित भागाची मुंबई , ठाण्याप्रमाणे झपाट्याने वाढ होत आहे. तर कल्याण पश्चिमेच्या शहाडपासून पुढे टिटवाळा पर्यंतच्या भागात अत्यंत वेगाने नागरीकरण होत आहे. या भागातून दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक कामानिमित्त ये – जा करत असतात. तर टिटवाळा येथील महागणपती मंदिराची संपूर्ण राज्यात ख्याती असून त्याच्या दर्शनासाठीही लाखो भाविक येत असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले. हा भाग कल्याणला रेल्वे आणि रस्ते मार्गाने जोडण्यात आला असला तरी याठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. परिणामी याठिकाणी जाण्या- येण्यासाठी लोकांना होणारा त्रास पाहता याठिकाणीही मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा विस्तार करण्याची मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केली.

कल्याणात एकाच ठिकाणी अद्ययावत प्रशासकीय भवन बनवा…

कल्याण हा ठाणे जिल्ह्यातील मोठा तालुका असून ज्यामध्ये ४ हून अधिक विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मात्र कल्याणात सध्या अस्तित्वात असणारी शासकीय कार्यालये ही एकमेकांपासून बऱ्याच अंतरावर असल्याने विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची त्यामुळे मोठी फरफट होत असते. या पार्श्वभूमीवर कल्याणात उपलब्ध असणाऱ्या मोठ्या भूखंडावर अद्ययावत प्रशासकीय भवनाची उभारणी करण्यात यावी. जेणेकरून लोकांना एकाच इमारतीमध्ये सर्व शासकीय कामे करणे सोयीचे होईल अशी मागणीही आमदार भोईर यांनी यावेळी केली.

रस्त्यांवरील खड्डे लवकरात लवकर भरण्यात यावे…
तर सध्या पावसाने उघडीप दिली असून कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवर पडलेले खड्डे तात्काळ भरण्याच्या सूचना केडीएमसी प्रशासनाला देण्याची आग्रही मागणीही आमदार भोईर यांनी यावेळी केली. गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला असून या खड्ड्यांमुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ती टाळण्यासाठी तातडीने रस्त्यावरील खड्डे भरण्याचे केडीएमसी प्रशासनाला निर्देश देण्याचे त्यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा