Home ठळक बातम्या कायापालट अभियान : आता कल्याणातील या भिंती ठरत आहेत आकर्षणाचे केंद्र

कायापालट अभियान : आता कल्याणातील या भिंती ठरत आहेत आकर्षणाचे केंद्र

 

रंगीबिरंगी चित्र संगतीने उजळून निघतोय बारावेचा रिंगरोड

कल्याण दि. ३० मे :
कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून कल्याण डोंबिवलीमध्ये शहर सौंदर्यीकरणाचे विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यापैकीच शहरांच्या दृष्टीने महत्वाकांक्षी असणाऱ्या कायापालट अभियानाअंतर्गत कल्याण पश्चिमेच्या बारावे परिसरातील भिंतीही आता रंगी बिरंगी चित्रांनी उजळून निघाल्या आहेत. अत्यंत देखण्या अशा या भित्तीचित्रांमुळे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटत आहे.

ठाकुर्ली येथील समांतर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या भिंतींवर देशातील दिग्गज व्यक्ती, शास्त्रज्ञ, कलाकार, खेळाडू आदींची चित्रं नजरेत भरत असताना आता कल्याण पश्चिमेतील बारावे येथील रिंग रोड येथील भिंतीही आता रंगी बिरंगी चित्रांनी जिवंत झाल्या आहेत.
केडीएमसी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांच्या पुढाकाराने बारावे घनकचरा प्रकल्प, बीएसयुपीच्या भिंतींनी अशी काही कात टाकली आहे की बस्स. जे.जे स्कूल ऑफ आर्टच्या कृती पटेल, नेरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अक्षरशः जीव ओतून इथल्या भिंती जिवंत केल्या आहेत. इथल्या भिंतींवर प्राणी, पक्षांसह इतर अनेक उत्साह वाढवणारी बोलकी चित्रं इकडे साकारण्यात आल्याची माहिती प्रशांत भागवत यांनी दिली. कल्याणातील काही नामांकित उद्योजकांनी दिलेल्या सीएसआर निधीतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

कल्याण डोंबिवली शहरांना लागलेला अस्वच्छतेचा डाग पुसण्यासाठी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी आणि प्रशासन सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या काही महिन्यात पालिका प्रशासनाकडून कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक क्रिएटिव्ह उपक्रम आकार घेऊ लागले आहेत. यापैकी शहर सौंदर्याच्या दृष्टीकोनातून भित्तीचित्रांच्या पर्यायाला नागरिकांची मोठी पसंती तर मिळत आहेच. शिवाय कल्याण डोंबिवली शहरे ही कात टाकू लागल्याचेही दिसत आहे याला कोणी नाकारणार नाही.

मागील लेखअनियमित पाणी पुरवठ्याविरोधात संतप्त रहिवाशांची एमआयडीसी कार्यालयावर धडक
पुढील लेखकेडीएमसी निवडणूक : उद्याच्या महिला आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा