Home ठळक बातम्या शारदीय नवरात्रौत्सवाचे हे आहे महत्व… सांगत आहेत सुप्रसिद्ध पंचांगकर्ते दा. कृ. सोमण

शारदीय नवरात्रौत्सवाचे हे आहे महत्व… सांगत आहेत सुप्रसिद्ध पंचांगकर्ते दा. कृ. सोमण

माळ पहिली
============
आज घटस्थापना – नवरात्रारंभ
====================
दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नम: ।
नम: प्रकृत्यै भद्रायै नियता: प्रणता: स्मताम् ॥

आज सोमवार, २६ सप्टेंबर, आश्विन शुक्ल प्रतिपदा. आज नवरात्रारंभ, घटस्थापना आहे. आजपासून शारदीय नवरात्रौत्सव प्रारंभ होत आहे. आज देवीची स्थापना करून समोर पहिली माळ बांधायची. आज सोमवार असल्याने देवी शुभ्र वस्त्र परिधान करणार आहे. नवरात्रातील वारांवरून हे रंग सांगितले जातात. यामागे कुठलेही धार्मिक कारण नाही. नवरात्रात याच रंगाची वस्त्रे नेसली तरच पुण्य मिळते, भविष्य उज्ज्वल होते असे अजिबात नाही. या रंगाची वस्त्रे नेसली नाही तर पाप लागते असेही नाही.

तरीही या रंगाची वस्त्रे भगिनी स्वेच्छेने परिधान करतात. सर्वांनी एकाच रंगाची वस्त्रे परिधान केल्याने एकतेची भावना निर्माण होते. निर्भयता वाटते. शिवाय आनंद प्राप्त होतो. असे काही महिलांचे मत आहे.

आश्विन महिना हा शरद ऋतूमध्ये येत असतो. या दिवसात शेतात तयार झालेले धान्य घरात येण्यास सुरुवात होते. त्यामुळेच शरद ऋतूला वैभवशाली समजण्यात येते. म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपण ” जीवेत् शरद: शतम् ” असे म्हणतो. आश्विन महिन्यात धान्य घरात येते म्हणून या महिन्याच्या प्रारंभीला पृथ्वीमधील या ‘ निर्मिती शक्तीला ‘ वंदन करण्यासाठी, तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘ नवरात्र‘ साजरा केला जातो. हे विश्व निर्माण झाले तेथपासून निर्मितीशक्ती कार्यरत आहे. म्हणूनच निर्मितीशक्तीला आदिशक्ती मानले गेले आहे. नवरात्र हे आदिशक्ती- निर्मितीशक्तीचे पूजन असते, तीची उपासना असते. निर्मितीशक्ती आहे म्हणूनच हे जग निर्माण झाले आहे. निर्मितीशक्ती नसती तर हे जग निर्माणच झाले नसते.

निर्मितीशक्तीची ही पूजा नऊ दिवस का असते ? असा प्रश्न मनांत येणे साहजिक आहे. नऊ या ब्रह्मसंख्येचे आणि निर्मितीशक्तीचे अतूट नाते आहे. अंकांमध्ये ‘ नऊ ‘ हा सर्वात मोठा अंक आहे. बी जमिनीत गेल्यावर नऊ दिवसांनी अंकुरते. पुढे त्याचा वृक्ष होतो. गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने नऊ दिवसानी मूल जन्माला येते. म्हणूनच ही आदिशक्तीची-निर्मितीशक्तीची पूजा नऊ दिवस केले जाते. आणि या नऊ दिवसांच्या उपासनेला ‘ नवरात्र ‘ असे म्हटले जाते आणि दुर्गादेवीसमोर दररोज एक याप्रमाणे वाढत जाणार्या नऊ पुष्पमाला बांधल्या जातात. घटस्थापनेला म्हणूनच धान्य रूजत घातले जाते.

‘दुर्गा ‘ हा शब्दच खूप काही सांगत असतो. देवीने दुर्ग नावाच्या दुष्ट राक्षसाला ठार मारले म्हणून देवीला ‘ दुर्गा ‘असे म्हटले जाते. दुर्गा शब्दातील ‘ द ‘कार हा दैत्यनाश असा अर्थ सूचित करतो. ‘ उ ‘कार हा विघ्ननाश वाचक असल्याचे वेदांनी मान्य केले आहे. ‘ रेफा ‘ चा रोगहरण, ‘ ग ‘ चा पापनाशन आणि ‘ आ ‘ चा भय आणि शत्रू यांचा नाश करणारा असा अर्थ सांगण्यात आला आहे. देवीने मधुकैटभ, महिषासूर,दुर्ग,शुंभ , निशुंभ इत्यादी राक्षसाना ठार मारले. दुर्गासप्तशतीमध्ये दुर्गेची श्रीमहाकाली, श्रीमहालक्ष्मी आणि श्रीमहासरस्वती अशी तीन रूपे असल्याचे सांगण्यात आले आहे.

घटस्थापनेचा विधी

नवरात्र हे कुलाचाराप्रमाणे करण्याची परंपरा आहे. नवरात्र हे काम्य व्रत आहे. घरात पवित्र जागी मंडप उभारून तिथे एक वेदी तयार करतात. नंतर स्वस्तिवाचनपूर्वक त्या वेदीवर सिंहारूढ अष्टभुजा देवीची स्थापना करतात. मूर्ती नसल्यास नवार्ण यंत्राची स्थापना करतात. यंत्राशेजारी एक घट स्थापन करून त्याची व देवीची यथाविधी पूजा करतात. व्रतधारी व्यक्तीने नऊ दिवस उपवास करायचा असतो. या व्रतात नऊ दिवस सप्तशतीचा पाठ करतात. अखंड दीप लावतात. घटावर रोज एक किंवा चढत्या क्रमाने फुलांच्या माझा बांधतात. होमहवन करतात. घटाशेजारी एका टोपलीत नवधान्य रूजत घालतात. रोज कुमारीची पूजा करून तिला भोजन घालतात. नवव्या दिवशी स्थापित घट व देवी यांचे उत्थापन करतात.

आपणास देव- देवी यांची पूजा का करण्यास सांगण्यात आले आहे ? हे प्रथम नीट समजून घेतले पाहिजे. पार्थिव गणेश पूजन हे जसे पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करावयाचे असते. तसेच या पृथ्वीच्या मातीतून जे धान्य तयार होते, त्या निर्मिती शक्तीची / आदिशक्तीची ही पूजा असते. ज्याची आपण पूजा करतो, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची असतेच , शिवाय त्याच्या अंगच गुण आपण घ्यावयाचे असतात. निर्मिती शक्ती आपल्या प्रत्येकाकडे असते. परंतू आपण तिचा नीट वापर करीत नाही. कर्म करीत करीत निर्मिती करीत रहायला पाहिजे. काही लोक सतत उद्योगात असलेले आपण पाहतो. तर काही लोक आळशी काहीही न करता जगत असतात. आपण आपले स्वत:चे जीवन सुखी आणि आनंदी करावयाचे आहे, तसेच इतरांच्या जीवनात आनंद व सौख्य यावे यासाठी त्यांना मदत करावयाची आहेच. निर्मिती शक्तीची पूजा करून आपण कर्मयोगी बनायचे आहे. अखंड ज्ञानाचा, सत्कर्माचा दीप तेवत ठेवायचा आहे आणि लांबी वाढत जाणा-या फुलांच्या माळेप्रमाणे प्रगती करीत जगायचे आहे.
महाराष्ट्रात वज्रेश्वरी ( वसई ), महालक्ष्मी (मुंबई/डहाणू ), महाकाली ( आडिवरे ), सप्तशृंगी (वणी), रेणुकादेवी ( माहूर ), महालक्ष्मी ( कोल्हापूर ), तुळजा भवानी ( तुळजापूर ), योगिनीमाता ( अंबेजोगाई ), श्री एकवीरादेवी ( कार्ला ) इत्यादी देवींच्या मंदिरांमध्ये नवरात्रोत्सव चालू असतो.

नवरात्रोत्सव
========
नवरात्रीचा हा ‘ उत्सव ‘ असतो. उत्सव शब्द काय सांगतो ? “;नियताल्हादजनकव्यापार: “ म्हणजे आल्हाद उत्पन्न करणारा उद्योग म्हणजे उत्सव ! ‘ मह उद्धव उत्सव: ‘ असे अमरकोशात दिले आहे. ज्या धार्मिक समारंभात तो करणा-या व त्यात भाग घेणा-या लोकांना हर्ष, आनंद आणि मनप्रसन्नता यांचा अनुभव येतो, त्याला ‘ उत्सव ‘ म्हणतात. नवरात्रात देवीची उपासना करीत असताना आपण उत्सव साजरा करून आनंद घेत असतो. या दिवसात दु:ख, चिंतातुर कलह सारे काही विसरून जात असतो. चैतन्याचा अनुभव घेत असतो.
महत्वाची गोष्ट म्हणजे मंदिर किंवा देवघरातील देवीची जशी आपण मनोभावे उपासना करीत असतो तशीच आणखी अनेक देवी आजी, आई, बहीण, सून, कन्या या रूपात आपल्या घरात वावरत असतात. त्यांच्याकडेही नीट लक्ष द्यावयास हवे. महालक्ष्मी म्हणजे आर्थिक सामर्थ्य, महासरस्वती म्हणजे विद्या-कलेचे सामर्थ्य आणि महाकाली म्हणजे शरीरसामर्थ्य हे आपल्या घरातील स्त्री देवतेत यावयास हवे. यासाठीही आपण मदत करायला हवी आहे.

म्हणूनच आधुनिक कालात घरात चौवीस तास , तीनशे पासष्ट दिवस घरात वावरणार्या या गृहदेवतेला प्रार्थना करतांना नम्रपणे म्हणावेसे वाटते की–
या देवी सर्वभूतेषु । गृहदेवतारूपेण संस्थिता ।।
नमस्तस्यै नमस्तस्यै । नमस्तस्यै नमो नम: ।।

 

नवरात्रीतील वस्त्रांचे नवरंग सन 2022
1) सोमवार 26 सप्टेंबर– सफेद / पांढरा
2) मंगळवार 27 सप्टेंबर- लाल
3) बुधवार 28 सप्टेंबर — निळा
4) गुरुवार 29 सप्टेंबर- पिवळा
5) शुक्रवार 30 सप्टेंबर — हिरवा
6) शनिवार 1 ऑक्टोबर — ग्रे/ राखाडी
7) रविवार 2 ऑक्टोबर — भगवा/ केशरी
8)सोमवार 3 ऑक्टोबर — गुलाबी
9) मंगळवार 4 ऑक्टोबर — जांभळा

 – दा. कृ. सोमण. – ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा