Home ठळक बातम्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर

१७ व्या लोकसभेतील कामगिरीचा गौरव, सर्वोत्कृष्ट पाच सदस्यांमध्ये समावेश

नवी दिल्ली दि.8 जानेवारी:
महाराष्ट्रातील कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकसभेतील कामगिरीवरून संसद रत्न पुरस्कार देण्यात येतो. कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये विकासाचा वेगळा पॅटर्न राबवणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे लोकसभेतही सर्वच कामकाजात सहभाग घेत असतात. त्यांच्या याच कामगिरीवरून यंदाचा पुरस्कार डॉ. शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे १७ व्या लोकसभेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेल्या पाच सदस्यांपैकी एक ठरले आहेत. २०१९ ते २०२३ या कार्यकाळात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ५५६ प्रश्न उपस्थित केले आहेत. ६७ चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे आणि १२ खाजगी विधेयक त्यांनी मांडली आहेत. (this-years-sansad-ratna-award-was-announced-to-mp-dr-shrikant-shinde)

१९९९ या वर्षात स्थापन झालेल्या प्राईम पॉइंट फाउंडेशन या एनजीओला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी संसद रत्न पुरस्काराबाबत सूचना केल्या होत्या. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सांगण्यावरून २०१० पासून लोकसभेतील आणि राज्यसभेतील सदस्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल दरवर्षी संसद रत्न पुरस्कार प्रदान केला जातो. तर संसद महारत्न पुरस्कार दर पाच वर्षातून एकदा दिला जातो. केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाचे माजी सहसंचालक यांसारखे अनेक सदस्य या पुरस्कारासाठी नावांची शिफारस करत असतात. हा एक प्रकारचा नागरिक सन्मान समजला जातो.
लोकसभा आणि राज्यसभा यातील कामकाजामध्ये घेतलेला सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न, मांडलेले प्रस्ताव, संसदेतील उपस्थिती आणि एकूण कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात. यंदाचा हा पुरस्कार कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना जाहीर झाला आहे. लोकसभेतील कामकाजात डॉ. श्रीकांत शिंदे सहभागी होत असतात. आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने गरजेच्या मुद्द्यांवर डॉ. शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातही पायाभूत सुविधा उभारण्यापासून सर्वच टप्प्यांवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. त्यांच्या याच कामगिरीची दखल घेऊन त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
२०१४ च्या लोकसभेत निवडून आलेले डॉ. श्रीकांत शिंदे हे तरुण खासदारांपैकी एक खासदार होते. २०१९ च्या निवडणुकीतही डॉ. श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते सुपुत्र आहेत. संसद रत्न पुरस्कार मिळाल्यामुळे डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामगिरीच्या शिरपेच्यात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा