Home ठळक बातम्या मायलेकीच्या गप्पांतून महिलांच्या मानसिक – शारीरिक आरोग्यावर प्रकाशझोत

मायलेकीच्या गप्पांतून महिलांच्या मानसिक – शारीरिक आरोग्यावर प्रकाशझोत

इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणचा स्तुत्य उपक्रम

कल्याण दि.१० फेब्रुवारी :
सध्याच्या धावपळीच्या जीवनात एकीकडे करिअर आणि दुसरीकडे कुटूंब अशी तारेवरची कसरत सांभाळताना स्वतःकडे लक्ष द्यायला महिला वर्गाला वेळच नाहीये. ज्यामूळे महिलांना आज वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. नेमका हाच धागा पकडून इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणतर्फे आयोजित गप्पा मायलेकीच्या कार्यक्रमातून महिलांच्या विविध समस्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला. येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला महिला वर्गाने मोठी गर्दी केली होती.

उपस्थित महिलांनीही दिली मनमोकळी दाद…

पौंगडावस्थेतील मुलींमधील अनियमित मासिक पाळीची समस्या, पीसीओडी आजार, कमी वयातील गर्भधारणा, तिशीनंतरची गर्भधारणा आणि त्यातील धोके, वंध्यत्व, मातृत्व, पालकत्व, महिलांमधील लठ्ठपणा, मानसिक आजार, बदललेली दिनचर्या – आहार, मासिक पाळी आणि धार्मिक संबंध अशा विविधांगी नाजूक मुद्द्यांवर या कार्यक्रमात अत्यंत खुलेपणाने चर्चा झाली. ज्याला उपस्थित महिलांनीही तितक्याच मनमोकळ्या पद्धतीने दाद दिली. तर सुप्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित यांचे अनुभव ऐकताना उपस्थित महिला वर्गाच्या डोळ्याच्या कडा आपसूकच पाणावल्याचे दिसून आले.

शास्त्रीय आणि धार्मिक दृष्टीकोनातून झाला उहापोह…

ज्यामध्ये डॉ. वर्षा फडके, डॉ. सोनाली चौधरी, डॉ. सफिया फरीद या नामांकित स्त्रीरोग तज्ञांनी पौंगडावस्थेतील मुली आणि प्रौढ महिलांना सध्या भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांचे अतिशय सोप्या शब्दांत निराकरण केले. तर सुप्रसिद्ध आहार तज्ञ डॉ. नितीन पाटणकर यांनी महिलांमधील वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येवर बोट ठेवत त्याची कारणीमिमांसा केल्याचे दिसून आले. तसेच कल्याणातील अनुभवी रेडीओलॉजीस्ट डॉ. प्रशांत पाटील यांनी महिलांच्या आजाराचे निदान करण्यात सोनोग्राफीचे महत्व अधोरेखित केले. तर कॉर्पोरेट कीर्तनकार अशी ओळख असणाऱ्या समीर लिमये यांनी दासबोधाच्या माध्यमातून समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या वेगवेगळ्या श्लोकांच्या आधारे मासिक पाळी आणि त्याच्या धार्मिक संबंधांवर प्रकाश टाकला.

आणि चिन्मयी सोबत महिलांचेही डोळे पाणावले…

तर सुप्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी एक कलाकार म्हणून, एक मुलगी म्हणून , एक सून म्हणून आलेले कौटुंबिक अनुभव यावेळी सर्वांसमोर उलगडून दाखवले. जे सांगताना त्या काहीशा भावूक झाल्या होत्या तर ते ऐकताना उपस्थित महिलांचे डोळेही आपसूकच भरून आले.

आरोग्य जागृतीसोबत जपले सामाजिक भानही…

डॉ. मृण्मयी भजक यांनी सूत्र संचालनाची यशस्वीपणे धुरा सांभाळत या तज्ञांशी संवाद साधला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला अनेक तरुण मुलींसोबतच, गर्भवती महिला, ज्येष्ठ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम संपल्यावर इंडीयन मेडीकल असोसिएशनतर्फे उपस्थित 800 महिलांना कापडी पिशव्या वाटून प्लॅस्टिकमुक्त शहरासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले.

यावेळी केडीएमसीचे उपआयुक्त अतूल पाटील, सचिव संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणचे डॉ. आश्विन कक्कर, डॉ. ईशा पानसरे, डॉ. सोनाली पाटील, डॉ. संदेश रोठे, डॉ. प्रशांत खटाळे, डॉ. हिमांशु ठक्कर, डॉ. विकास सुरंजे आदींनी विशेष मेहनत घेतली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा